जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील आरोग्यदूत शिवाजी पाटील यांनी हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. गावाच्या सरपंचांच्या एका हाकेला प्रतिसाद देत, त्यांनी स्वतः रक्तदान करून २ वर्षीय चिमुकलीचे प्राण वाचवले. विशेष म्हणजे, हे त्यांचे तब्बल ५६ वे रक्तदान ठरले असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात खुशी भानुदास चव्हाण ही दोन वर्षांची बालिका कावीळ आणि निमोनियाने त्रस्त होती. तिच्या उपचारासाठी तातडीने रक्ताची आवश्यकता होती, मात्र रक्त साठा उपलब्ध नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ सुरू होती. शेवटी त्यांनी आपल्या गावचे सरपंच प्रल्हाद चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीची गंभीरता ओळखून सरपंचांनी तत्काळ मंत्री गिरीश महाजन यांचे आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला.

शिवाजी पाटील यांनी त्वरित रक्त मिळवण्यासाठी विविध ठिकाणी प्रयत्न केले, पण निराशाच हाताला येत होती. अखेरीस त्यांनी रेड क्रॉसशी संपर्क साधला असता, त्यांनी स्पष्ट सांगितले की “डोनर मिळाल्यासच रक्त पुरवठा केला जाईल.” या आव्हानात्मक क्षणी क्षणाचाही विलंब न करता शिवाजी पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत रक्तदान केले. त्यांच्या या निःस्वार्थ कृतीमुळे चिमुकलीच्या उपचारासाठी आवश्यक रक्त वेळेत उपलब्ध झाले आणि तिच्या जीवावरचे संकट टळले.
हे रक्तदान त्यांच्या जीवनातील ५६वे ठरले असून, याआधीही त्यांनी ५५ वेळा रक्तदान करून अनेक रुग्णांना नवजीवन दिले आहे. त्यांचे हे कार्य केवळ एका व्यक्तीचे योगदान नसून, समाजात मानवतेचा दीप प्रज्वलित करणारे उदाहरण आहे.
शिवाजी पाटील यांच्या या कृतीबद्दल रुग्णाच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या त्यांच्या आरोग्यदूतांच्या कार्याची दखल घेत प्रशंसेचा वर्षाव केला. समाजातील अनेक तरुणांसाठी हे उदाहरण प्रेरणादायी ठरणारे आहे.



