अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खान्देशाच्या साहित्यविश्वाला नवचैतन्य देणाऱ्या ‘खान्देश साहित्य संघा’च्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीमध्ये नवी नियुक्ती करण्यात आली असून प्रसिद्ध गझलकार व कवी शरद धनगर यांची जिल्हाध्यक्षपदी, तर ज्येष्ठ पत्रकार उमेश काटे यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती संघाचे केंद्रिय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांनी तीन वर्षांच्या कालावधीसाठी जाहीर केली आहे.

या नियुक्तीपत्राचे वितरण जेष्ठ साहित्यिक डॉ. फुला बागुल, अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे, जेष्ठ साहित्यिक डॉ. सयाजी पगार, कवी कैलास भामरे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रत्नाताई पाटील आणि प्रा. रमेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन ‘खान्देश साहित्य संघा’चे केंद्रिय सचिव रमेश बोरसे यांच्या हस्ते पार पडले.

नियुक्त जिल्हाध्यक्ष शरद धनगर हे एक ख्यातनाम गझलकार असून त्यांनी विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय साहित्यिक मंचांवर आपल्या कवितांद्वारे ठसा उमटवला आहे. त्यांनी सोनी मराठी वाहिनीवरील “कोण होणार करोडपती?” या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. तसेच नवी दिल्ली येथील ‘साहित्य अकादमी’ आयोजित ‘साहित्योत्सव’ या राष्ट्रीय संमेलनात तसेच उस्मानाबाद येथे झालेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात’ ते निमंत्रित कवी म्हणून सहभागी झाले होते. अमळनेर येथे पार पडलेल्या ‘पहिल्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलना’च्या आयोजनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
तर नव नियुक्त जिल्हा सचिव उमेश काटे हे गेल्या पंचवीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी विविध सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक विषयांवर प्रभावी लेखन केले आहे. ते सध्या ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ अमळनेर शाखेचे कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन’ (अमळनेर) आणि ‘अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन’ (धुळे) या प्रतिष्ठित साहित्य सोहळ्यांचे सूत्रसंचालन केले आहे. तसेच एल्गार मराठी गझल संमेलनाच्या आयोजनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
या दोन्ही साहित्यसेवकांच्या कार्याची दखल घेत प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी त्यांच्यावर जिल्हास्तरीय जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या निवडीबद्दल ‘मसाप’ अमळनेर शाखा, पू. साने गुरुजी मोफत वाचनालय व ग्रंथालय, शिवशाही फाउंडेशन, साने गुरुजी शैक्षणिक विचार मंच तसेच मराठी वाङ्मय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
या नियुक्त्यांमुळे खान्देशातील साहित्यिक चळवळीला नवा उत्साह आणि दिशा मिळेल, असा विश्वास साहित्यविश्वाने व्यक्त केला आहे.



