Home Cities जळगाव रायपूर फाटा ते कुसुंबा विमानतळ मार्गावर  “१० दिवसांत पथदिवे व गतीरोधक बसवा,...

रायपूर फाटा ते कुसुंबा विमानतळ मार्गावर  “१० दिवसांत पथदिवे व गतीरोधक बसवा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन”

0
204

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराबाहेरील रायपूर फाटा ते कुसुंबा विमानतळापर्यंतच्या महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून अपघातांची मालिका सुरू असून, या रस्त्यावर रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जळगाव तालुक्याने भारतीय राष्ट्रीय मार्ग प्राधिकरणाला निवेदन देत तात्काळ गतीरोधक आणि Hymast LED पथदिवे बसविण्याची मागणी केली आहे. अन्यथा १० दिवसांच्या आत कार्यवाही न झाल्यास “शिवसेना स्टाइलमध्ये” रास्ता रोको आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद गंगाधर घुगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रायपूर गावापासून कुसुंबा विमानतळापर्यंतचा संभाजीनगर महामार्ग रात्रीच्या वेळी अत्यंत अंधारमय असतो. परिणामी या मार्गावर दररोज छोटे-मोठे अपघात घडत असून, आतापर्यंत चार ते पाच निरपराध नागरिकांचा जीव गेला आहे, तर काहीजण कायमचे अपंग झाले आहेत. या अपघातांसाठी भारतीय राष्ट्रीय मार्ग प्राधिकरणच जबाबदार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही अनेक वेळा या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. शहराकडून तसेच संभाजीनगरकडून येणाऱ्या वाहनांचा वेग अतिशय जास्त असल्याने आणि रस्त्यावरील दुभाजकांमध्ये अंतर असल्यामुळे, मोकाट जनावरे — गायी, म्हशी, कुत्रे — रस्त्यावर वारंवार ये-जा करतात. त्यामुळे वाहनचालकांचा ताबा सुटून अपघात घडत आहेत.

या वाढत्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. घुगे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, “जर १० दिवसांच्या आत या मार्गावर Hymast LED पथदिवे आणि गतीरोधक बसविण्यात आले नाहीत, तर शिवसेना तालुका पातळीवर तीव्र आंदोलन उभारेल आणि रास्ता रोको करण्यात येईल.”

शिवसेनेने स्पष्ट केले आहे की, हा प्रश्न फक्त जनतेच्या सुरक्षिततेचा आहे आणि प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन लोकांची होणारी तारांबळ थांबवावी, हीच अपेक्षा आहे.


Protected Content

Play sound