Home क्राईम तांबापुरा परिसरात क्रिकेटच्या वादातून दगडफेक; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

तांबापुरा परिसरात क्रिकेटच्या वादातून दगडफेक; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात क्रिकेट खेळण्याच्या किरकोळ वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, टिपू सुलतान चौक आणि गवळीवाडा चौक या भागांमध्ये दोन गटांमध्ये वाद वाढत जाऊन दगडफेकीपर्यंत पोहोचला. या दगडफेकीत तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद अचानक तीव्र झाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले. एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, आरसीपी प्लॅटूनसह मोठा पोलीस बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे. या घटनेनंतर परिसरात पेट्रोलिंग वाढवण्यात आले असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound