अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात आज उमेदवारांच्या मुलाखतींना उत्साहपूर्ण प्रतिसाद लाभला.

स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, अमळनेर येथे झालेल्या या प्रक्रियेत एकूण ९६ इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदवला. या मुलाखतींना भाजप जळगाव जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी व राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे तसेच जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ व तालुका निवडणूक प्रमुख पोपट तात्या भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अमळनेर नगर परिषदेत १८ प्रभागांमधील ३६ जागांसाठी झालेल्या या मुलाखतीत ९२ प्रभागनिहाय उमेदवारांनी तर अनुसूचित जमाती आरक्षित नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवारांनी आपली दावेदारी सादर केली.

मुलाखतीदरम्यान उमेदवारांचा आत्मविश्वास, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नगरविकासाबद्दलची सकारात्मक दृष्टी विशेष ठळकपणे दिसून आली. या प्रक्रियेद्वारे आगामी निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार निश्चित करण्याचे कार्य नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पडले.
यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री संजय सावकारे म्हणाले की, “अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रामाणिकपणे काम करतील. जनता विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवते, आणि हा विश्वास जपण्याची जबाबदारी आपली आहे.” तर खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले,
“अमळनेर नगर परिषद निवडणूक ही संघटनशक्तीची आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेची परीक्षा आहे. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची मेहनत याच्या बळावर निश्चितच बहुमताचा विजय मिळवेल.”
या मुलाखतींना भाजप कोअर टीमचे प्रमुख सदस्यही उपस्थित होते जिल्हाउपाध्यक्ष लालचंद सैनानी, डॉ अनिल शिंदे, निरज अग्रवाल,मंडल अध्यक्ष योगेश महाजन, जिजाबराव पाटील, राहुल पाटील, बाळासाहेब पाटील, शितल देशमुख आणि श्याम पाटील यांचा त्यात समावेश होता.



