जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ७ नोव्हेंबर रोजी राज्यभर ‘विद्यार्थी दिन’ साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे शुक्रवारी (७ नोव्हेंबर) विद्यार्थीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. डॉ. आंबेडकरांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. त्याच ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून महाराष्ट्र शासनाने २०१७ मध्ये हा दिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून घोषित केला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांमध्ये चेतन नन्नवरे, जयसिंग वाघ, हरिश्चंद्र सोनवणे , ॲड. आनंद कोचुरे, प्रा. प्रितीलाल पवार, बाबुराव वाघ, सतीश गायकवाड, आशिष सपकाळे, सुभाष सपकाळे, यशवंत मोरे, अभय सोनवणे, मुकुंद सपकाळे आदींचा समावेश होता. या प्रसंगी भंते सुबोधा थेरो यांनी त्रिशरण पंचशील देऊन कार्यक्रमाला धार्मिक आणि आध्यात्मिक दिशा दिली.

यानंतर उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या विद्यार्थी जीवनातील प्रेरणादायी प्रवासावर भाष्य केले. प्रा. प्रितीलाल पवार यांनी बाबासाहेबांच्या ज्ञानप्रेमाचा उल्लेख करत म्हटले की, “इतकी उंच विद्वत्ता असूनही आंबेडकरांनी आयुष्यभर स्वतःला विद्यार्थी म्हणूनच पाहिले, हेच त्यांचे खरे महानत्व आहे.” तर जयसिंग वाघ आणि आशिष सपकाळे यांनी विद्यार्थ्यांनी आंबेडकरांचा आदर्श घेऊन शिक्षण आणि समाजसेवा या दोन्ही क्षेत्रात पुढे जाण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले, तर आभार बाबुराव वाघ यांनी मानले. या कार्यक्रमात विविध सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



