Home राजकीय मनोज जरांगे पाटील यांची धक्कादायक कबुली : माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनी...

मनोज जरांगे पाटील यांची धक्कादायक कबुली : माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनी रचला


बीड – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सनसनाटी खुलाशाने राज्यातील राजकीय वातावरणात प्रचंड खळबळ उडाली आहे. जरांगे यांनी आरोप केला आहे की त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला असून, या कटामागे राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा त्यांनी थेट दावा केला आहे. या प्रकरणात दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याची माहिती मिळत आहे.

जरांगे यांनी माध्यमांसमोर उघड केले की, “हा कट रचणारा बीडमधील कांचन नावाचा व्यक्ती आहे, जो धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय कार्यकर्ता आहे. माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यासाठी धनंजय मुंडेंनी त्याच्याशी संपर्क साधला. त्याला परळी येथे नेण्यात आले आणि तिथे मोठी बैठक चालू असताना मुंडे स्वतः त्या व्यक्तीला भेटले,” असा गंभीर दावा त्यांनी केला.

जरांगे पुढे म्हणाले, “पहिल्यांदा माझ्याविरोधात खोटे व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग तयार करण्याचे काम दिले गेले. त्यानंतर कटाचा पुढचा टप्पा ठरवण्यात आला – गोळ्या देऊन किंवा विषारी औषधाद्वारे माझा खून करण्याचा.” त्यांनी आरोप केला की, “या व्यवहारासाठी दोन कोटी रुपये आणि अडीच लाख रुपये अतिरिक्त अशा स्वरूपात करार ठरवण्यात आला होता.”

ते पुढे म्हणाले, “संभाजीनगरमधील एका स्टॉपवर धनंजय मुंडे हे आरोपींना भेटले होते. ‘गोळ्या आणि अन्य साधनं मी पुरवतो,’ असे मुंडे यांनी त्या आरोपींना सांगितल्याची माहिती मिळाली आहे.” त्यांनी पुढे भाऊबीजेच्या दिवशी पुन्हा एक कट रचल्याचा खुलासा केला. “त्या दिवशी आरोपींनी मला गाडीने धडक देऊन संपवण्याचा प्लॅन आखला. यासाठी त्यांनी गाडी मागितली असता, मुंडे म्हणाले की ‘नवी नको, माझ्याकडे परराज्यातील पासिंग असलेली जुनी गाडी आहे ती देतो’,” असे जरांगे यांनी सांगितले.

या कटात आंतरवली परिसरातील एका ‘बडे’ नावाच्या व्यक्तीसह तब्बल १० ते ११ जण सहभागी असल्याचाही जरांगे यांनी दावा केला. त्यांनी प्रशासनाकडे या कटाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. “ही वृत्ती राज्याला आणि समाजाला शोभणारी नाही. खून करून कोणीही राजकारणात मोठा होत नाही. या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे, अन्यथा लोकशाही धोक्यात येईल,” असे ते म्हणाले.

या धक्कादायक आरोपांनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून मुंडे यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरणाची मागणी होत असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound