वरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, प्रशासन आणि राजकीय पक्ष या दोघांचीही लगीनघाई सुरू झाली आहे. सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी पालिका मुख्याधिकारी सचिन राऊन यांनी शहरातील सर्व ३१ मतदान केंद्रांची पाहणी करून निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

या पाहणीदरम्यान कार्यालय अधीक्षक राशिद नौरंगाबांदी उपस्थित होते. मुख्याधिकारी राऊन यांनी मतदान केंद्रांवरील वीज, पाणी, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षा यांसारख्या सर्व सुविधा तपासल्या. नागरिकांना मतदानाच्या दिवशी कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. प्रशासनाकडून तयारीला वेग देण्यात येत असून, सर्व कर्मचारी वर्ग निवडणुकीच्या नियोजनात गुंतला आहे.

यंदाच्या निवडणुकीत वरणगाव शहरातील २६ हजार ९७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रभाग क्रमांक १० मध्ये सर्वाधिक मतदार असून, प्रभाग क्रमांक २ मध्ये सर्वात कमी मतदार आहेत. नगरपालिकेच्या १० प्रभागांमधून एकूण २१ नगरसेवक निवडले जाणार आहेत — ज्यात ११ महिला आणि १० पुरुष नगरसेवकांना स्थान मिळणार आहे. तसेच, यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठीही थेट मतदान होणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
राजकीय पक्षांनीही निवडणुकीसाठी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. भाजपने इच्छुक उमेदवारांकडून बैठका आणि अंतर्गत चर्चा सुरू केल्या आहेत, तर काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट व अजित पवार गट) यांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. संभाव्य आघाड्या आणि युतीबाबत चर्चांना वेग आला असून, “कोण कुणाच्या सोबत?” याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीचा बिगुल वाजण्यास आता केवळ काही दिवस उरले असून, “नगराध्यक्षपदाची गादी आणि सत्ता कोणाच्या हातात जाणार?” याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, भुसावळ आणि वरणगाव नगरपालिकांमध्ये आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. प्रशासनाने शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावलेले राजकीय बॅनर, होर्डिंग्ज आणि पोस्टर हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. यासाठी दंवडी (सूचना फलक) लावून नागरिकांना तसेच राजकीय पक्षांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाचे उद्दिष्ट म्हणजे निवडणुकीदरम्यान पारदर्शकता आणि कायदेशीर शिस्त राखणे.
वरणगाव शहरातील निवडणुकीच्या तयारीला आता अंतिम रूप येत असून, शहरात निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगू लागला आहे. प्रशासन सज्ज आहे आणि राजकीय पक्षही रणनिती आखण्यात मग्न आहेत. शेवटी निर्णय मतपेट्या उघडल्यावरच होणार आहे.



