Home क्राईम चार तासांत पोलिसांची धमाकेदार कारवाई : मोटारसायकलसह  आरोपी जेरबंद

चार तासांत पोलिसांची धमाकेदार कारवाई : मोटारसायकलसह  आरोपी जेरबंद


पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोर्यातील गुन्हे शोध पथकाने चोख तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर अवघ्या चार तासांत चोरीचा गुन्हा उकलत आरोपीस जेरबंद केले असून चोरी गेलेली मोटारसायकल देखील हस्तगत करण्यात आली आहे. या जलद कारवाईमुळे शहरात पोलिसांबद्दल प्रशंसा व्यक्त केली जात आहे.

४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा ते दिडच्या सुमारास मनोज डिगंबर जाधव (रा. भोजे चिंचपुरे) हे जारगाव चौफुली येथे आले होते. त्यांनी त्यांची काळ्या रंगाची बजाज प्लॅटीना (क्र. एमएच-१९ सीपी-०८६९) रोडलगत पार्क करून फळ घेण्यासाठी थोडा वेळ दूर गेले असता, अज्ञात चोरट्याने त्यांची मोटारसायकल चोरी करून नेली. याबाबत मनोज जाधव यांनी पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शोध पथकाला पाचारण करण्यात आले. तपासादरम्यान पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंपी, पो.कॉ. योगेश पाटील, शरद पाटील, गणेश कुवर आणि श्रीराम शिंपी यांनी सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. दरम्यान, गुन्ह्याचा तपास सुरू असताना संशयित इसम कृष्णपुरी परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

त्यावर पथकाने तत्काळ कृष्णपुरी परिसरात जाऊन सापळा रचला. काही वेळानंतर एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपले नाव भगवान लक्ष्मण पाटील (वय ३५, रा. पिंप्री खुर्द, ता. पाचोरा) असे सांगितले. पुढील चौकशीत त्याने चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीच्या आधारे पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली सुमारे ४५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची बजाज प्लॅटीना मोटारसायकल हस्तगत केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंपी करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, चाळीसगाव परिमंडळाच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

या जलद आणि परिणामकारक कारवाईमुळे पाचोरा पोलिसांचे जनतेत कौतुक होत असून, गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धसका निर्माण झाला आहे.


Protected Content

Play sound