मुंबई (वृत्तसंस्था) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाजनादेश यात्रा निघणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मैदानात उतरत आहेत.
1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यानच्या या यात्रेत मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देतील. तसेच सरकारने राबवलेल्या योजनांची माहितीही मुख्यमंत्री मतदारांना देणार आहेत. तसेच या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचीही भेट मुख्यमंत्री घेतील. या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी होणार आहेत. एकीकडे शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपानेही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले असले तरीही आगामी विधानसभेसाठी महाराष्ट्रात भाजपा- शिवसेना युती होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.