Home क्राईम रोहित आर्यचा अंत्यसंस्कार पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत

रोहित आर्यचा अंत्यसंस्कार पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत


पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मुंबईतील पवई येथे १७ मुलांना ओलीस ठेवून झालेल्या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या रोहित आर्यचा अंत्यसंस्कार गुरुवारी पहाटे पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात आला. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी रोहितचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. त्यानंतर पत्नी आणि कुटुंबीयांनी अत्यंत गुप्ततेत अंत्यसंस्काराची तयारी केली.

रोहित आर्यचा मृतदेह गुरुवारी मध्यरात्रीनंतर पुण्याला आणण्यात आला. अंत्यसंस्काराची तयारी रात्रीच सुरू करण्यात आली होती. पहाटे दोन वाजून तीस मिनिटांनी अंत्यसंस्कार पार पडले. त्याच्या पत्नी, मुलगा आणि काही नातेवाईकांनी चेहऱ्यावर स्कार्फ बांधून उपस्थिती दर्शवली. उपस्थितांमध्ये सुमारे १२ नातेवाईक होते. संपूर्ण विधी अत्यंत शांततेत आणि मर्यादित उपस्थितीत पार पडला.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये रोहित आर्यने १७ मुलांना ओलीस ठेवले होते. मुलांना वेब सिरीजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून ऑडिशनच्या नावाखाली त्यांना स्टुडिओमध्ये बोलावण्यात आले होते. मात्र, या घटनेनंतर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून मुलांची सुटका केली. मोहिमेदरम्यान स्टुडिओच्या बाथरूमच्या खिडकीची काच फोडून पोलिसांनी आत प्रवेश केला आणि रोहितकडे शस्त्र दिसल्याने त्यांनी गोळीबार केला. या चकमकीत रोहित ठार झाला, तर १७ मुलांसह २० जणांचे जीव वाचले.

नंतर तपासात समोर आले की, रोहितकडे असलेली बंदूक बनावट होती आणि ती एअर गन असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेने चित्रपटसृष्टी आणि जनमानसात मोठी चर्चा निर्माण केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुढे सुरू ठेवला असून, त्यामागील हेतू आणि पार्श्वभूमीचा शोध घेतला जात आहे.

या घटनेने मुंबईसह संपूर्ण राज्याला हादरवले असून, मनोरंजन क्षेत्रातील सुरक्षिततेबाबत नव्याने प्रश्न निर्माण केले आहेत. पोलिसांनी अशा प्रकारच्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे.


Protected Content

Play sound