सावदा (ता. रावेर) – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लोहपुरुष आणि अखंड भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त सावदा पोलीस स्टेशन तर्फे ‘रन फॉर युनिटी’ या ऐक्य धावण्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. सकाळच्या थंडगार वातावरणात नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि पोलिस अधिकारी एकत्र येत देशभक्तीच्या भावनेने शहरभर एकतेचा संदेश देताना दिसले.

३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता या उपक्रमाची सुरुवात दुर्गा माता मंदिर परिसरातून हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. ‘रन फॉर युनिटी’ रॅलीने सावदा शहरातील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण केले. रॅलीदरम्यान “एक भारत, श्रेष्ठ भारत”, “वंदे मातरम” आणि “भारत माता की जय”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून सहभागींचे स्वागत करत ऐक्य आणि देशप्रेमाचा उत्साह व्यक्त केला.

रॅलीचा समारोप सावदा पोलीस स्टेशन येथे झाला. तेथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित सर्वांनी एकत्रित स्वरात “वंदे मातरम” आणि राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमात सावदा पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांच्या या उपक्रमाने समाजात राष्ट्रीय एकता, अखंडता आणि देशभक्तीचा भाव जागवण्याचे कार्य केले. सर्व स्तरातील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून ‘रन फॉर युनिटी’ खऱ्या अर्थाने जनतेचा उत्सव ठरला.



