धरणगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी 2025 च्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत तयारी जोरात सुरू झाली असून, सर्वसमावेशक आणि न्याय्य उमेदवारीसाठी हालचालींना वेग आला आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकरा वार्डांमधील इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.

महायुतीच्या नेत्यांनी सर्व समाजांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी प्रयत्नशील राहण्याचे धोरण आखले आहे. आगामी निवडणुकीत कोण नगराध्यक्षपदावर विराजमान होणार हे अजून स्पष्ट झालेले नसले तरी, वरिष्ठ पातळीवर या निर्णयावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, वरिष्ठ पातळीवरून सर्व हालचाली तत्परतेने पार पाडण्याचे निर्देश स्थानिक पातळीवरील नेत्यांना देण्यात आले आहेत. प्रत्येक इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांना आपल्या विभागात सक्रिय राहून प्रचाराची तयारी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत मात्र अजूनही पडदा कायम आहे. महायुतीच्या अंतर्गत चर्चांमधून हे स्पष्ट झाले आहे की, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली लवकरच घेण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या निवडणुकीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महायुतीने निवडणुकीसाठी सज्जतेचा बिगुल वाजवला असून, सर्व समाजांचा सहभाग वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. नगराध्यक्षपद कोणाला मिळणार हे रहस्य लवकरच उलगडेल अशी अपेक्षा आहे.



