अमळनेर,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त अमळनेर तसेच ग्रामीण परिसरातील मारवड पोलिस ठाण्याच्या वतीने ‘रन ऑफ युनिटी’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. देशातील ऐक्य, एकात्मता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थ, पोलिस अधिकारी आणि होमगार्ड यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या कार्यक्रमात मारवड पोलिस स्टेशनचे एपीआय जीभाऊ पाटील, उपनिरीक्षक विनोद पवार, सात्री ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र बोरसे, तसेच फ्रूट सेलचे माजी चेअरमन शामकांत पाटील उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थ आणि पोलीस कर्मचारी, महिला व पुरुष होमगार्ड यांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या घोषणांसह रस्त्यांवरून धाव घेत देशभक्तीचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर होमगार्ड पथकाचे तालुका समादेशक अधिकारी गोपाल वना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सहभागी सर्वांनी सरदार पटेल यांच्या देश एकत्रीकरणातील योगदानाचे स्मरण केले आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेत, समाजात ऐक्य आणि बंधुभाव टिकवून ठेवण्याचा संदेश दिला. अमळनेर व मारवड परिसरात या उपक्रमामुळे देशभक्तीचा आणि सामाजिक ऐक्याचा जागर भरून वाहू लागला.



