Home क्राईम हृदयद्रावक! : भरधाव ट्रकने दुचाकीला उडविले; तरूणाचा दुदैवी मृत्यू, कुटुंबियांचा आक्रोश !

हृदयद्रावक! : भरधाव ट्रकने दुचाकीला उडविले; तरूणाचा दुदैवी मृत्यू, कुटुंबियांचा आक्रोश !


अडावद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अडावद येथील वडगाव रस्त्यावर गुरुवार (३० ऑक्टोबर) रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. टरबूजने भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने, दुचाकीस्वार २१ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे अडावद परिसरात शोककळा पसरली असून, रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणाबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

गॅरेजमधून घरी येत असताना काळाचा घाला:
आकाश ज्ञानेश्वर पाटील (वय २१, रा. इंदिरानगर प्लॉट, अडावद) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश हा अत्यंत गरीब कुटुंबातील होतकरू तरुण होता आणि तो वडगाव रस्त्यावरील बस स्टॅन्डजवळील ‘दोस्त ऑटो गॅरेज’चे मालक बापू पाटील यांचा पुतण्या होता. तो आपल्या वडिलांच्या दुकानातही मदत करत असे.

आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास आकाश गॅरेजवरून दुपारच्या जेवणासाठी आपल्या घरी मोटारसायकल (क्र. एम. एच. १९ एन. ५९७९) वरून निघाला होता. वडगाव रस्त्यावरील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर तो येत असतानाच, चंदसनी, कमळगाव, वडगाव भागातून टरबूज घेऊन अडावदकडे येणाऱ्या मालट्रक (क्र. आर. जे. ४० जी. ऐ. ४१९६) वरील चालकाने रस्त्याची परिस्थिती न पाहता वाहन चालवले आणि आकाशच्या मोटारसायकलीस जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, आकाश पाटीलचा जागीच मृत्यू झाला.

ट्रकचालक फरार; पोलिसांची तत्परता:
अपघात घडल्यानंतर ट्रकचालक ट्रक जागेवरच सोडून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस स्टेशनचे हे. कॉ. शेषराव तोरे, सुनील तायडे, किरण शिरसाठ, फिरोज तडवी, पो. कॉ. भूषण चव्हाण, प्रदिप पाटील, जयदीप राजपूत, विजय बच्छाव, अक्षय पाटील, दिलीप पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतूक सुरळीत करत अपघातग्रस्त ट्रक व मोटारसायकल पोलीस ठाण्यात जमा केली. मयताचे शव उत्तरीय तपासणीसाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

वडगाव रस्ता अतिक्रमणाने गुदमरला:
या अपघातानंतर ग्रामस्थांनी रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात मोठा संताप व्यक्त केला. अपघातग्रस्त वडगाव रस्ता दुतर्फा अतिक्रमणाने गुदमरला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आणि अतिक्रमित वस्तू ठेवल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. अतिक्रमणामुळेच रस्ते निमुळते होऊन अपघात वाढले आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला असून, तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound