रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहराच्या राजकारणात तब्बल तीन दशकांनंतर मोठा बदल घडवणारा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. आगामी नगर पालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर आणि पक्षाच्या अधिकृत कमळ चिन्हावर लढणार असल्याची घोषणा झाल्याने रावेरच्या राजकीय पटलावर नवे समीकरण आकार घेऊ लागले आहे. शहरातील वातावरणात राजकीय हालचालींना आता वेग आला आहे.

नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असून, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भाजपने रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे. शहरातील बारा प्रभागांमध्ये गुप्त सर्वेक्षण मोहीम राबवून इच्छुक उमेदवारांच्या जनाधाराचा अभ्यास सुरू आहे. नागरिकांमध्ये लोकप्रियता, कार्याचा प्रभाव आणि स्थानिक ओळख या सर्व घटकांचा सखोल तपास पक्षस्तरावरून घेतला जात आहे.

भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन तसेच आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा प्रभावशाली स्थानिक नेत्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे सर्व नेते सध्या फिल्डवर सक्रिय असून, मतदारांशी संवाद साधत प्रत्येक प्रभागाचे राजकीय गणित तपासत आहेत.
१९९६ साली भाजपने प्रथमच रावेर नगर पालिकेच्या निवडणुकीत कमळ चिन्हावर उमेदवार उभा केला होता. त्या वेळी पद्माकर महाजन हे उमेदवार होते, परंतु अनुभवाअभावी पक्षाला यश मिळाले नव्हते. त्यानंतर सलग तीस वर्षे भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक न लढवता स्थानिक आघाड्यांवर भर दिला. आता मात्र पक्षाने नव्या जोमाने आणि संघटनात्मक बळावर पुन्हा कमळ फुलवण्याची तयारी सुरू केली आहे.
भाजप शहर शाखेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला पक्षश्रेष्ठींकडून स्पष्ट आदेश आहेत की रावेर नगर पालिका निवडणूक कमळ चिन्हावरच लढवायची. सर्व बारा प्रभागात आमचे उमेदवार पक्षाच्या नावावर उतरतील. आमच्या तयारीला सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.”
या निर्णयामुळे रावेरमध्ये राजकीय वातावरण अधिक तापले आहे. विरोधक पक्षांची रणनीती आणि भाजपने उभारलेल्या नव्या संघटनात्मक मोर्चामुळे आगामी निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. आता विरोधक भाजपच्या या नव्या समीकरणांना कसे तोंड देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



