Home Cities मुक्ताईनगर घोडसगाव शाळेत आठवणींचा सोहळा; माजी विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा सन्मान आणि देणगीद्वारे विकासाचा निर्धार

घोडसगाव शाळेत आठवणींचा सोहळा; माजी विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा सन्मान आणि देणगीद्वारे विकासाचा निर्धार


मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा आयोजित करण्याच्या शासनाच्या सूचनेनुसार, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा घोडसगाव येथे माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात पार पडला. या उपक्रमाचा उद्देश समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढवणे, माजी विद्यार्थी आणि शाळेमध्ये परस्पर संवाद प्रस्थापित करणे तसेच श्रमदानातून शाळेचा सर्वांगीण विकास साधणे हा होता.

या कार्यक्रमाला पूर्णामाई विद्यालय घोडसगाव येथील आजी-माजी शिक्षक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते उपस्थित शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शाळेतील आपल्या काळातील संस्मरणीय अनुभव उपस्थितांसमोर मांडले. जुन्या आठवणींनी वातावरण भावनावेधक झाले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित शिक्षकांनीही आपल्या शैक्षणिक प्रवासातील अनुभव आणि मार्गदर्शनपर विचार मांडले. विद्यार्थ्यांसाठी सामूहिक खेळांचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे जुन्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आपलेपणा वाढला. स्नेहसंमेलनाच्या शेवटी आजी-माजी विद्यार्थ्यांनी शाळेला ५१०० रुपयांची देणगी दिली, ज्यातून शाळेच्या विकासासाठी सर्वांनी आपला वाटा उचलण्याची भावना व्यक्त केली.

सामूहिक स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद दुट्टे आणि शिक्षक श्री. भिका जावरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्नेहसंमेलनामुळे शाळेचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांना जोडणारा संवादाचा पूल बांधला गेला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound