
यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अखंड कार्य करत, पतपेढीच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे एस. डी. भिरुड सर यांचा यावल तालुक्यातील भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. जळगाव जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीने त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखवत त्यांची “तज्ञ संचालक” म्हणून बिनविरोध निवड केली आहे. या निमित्ताने यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित तालुकास्तरीय सत्कार सोहळ्यात मान्यवर शिक्षक व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एस. डी. भिरुड हे सलग अकरा वर्षे पतपेढीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले असून त्यांच्या काळात पतपेढीने उल्लेखनीय प्रगती साधली. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहरात सदस्य आणि त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी आधुनिक इमारत उभारण्यात आली. पूरग्रस्तांना मदतीचा हात देत पतपेढीमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल अकरा लाख रुपयांची देणगी देण्यात आली, ही कामगिरी संपूर्ण जिल्ह्यात आदर्श ठरली. पारदर्शक कारभार, शिस्तबद्ध आर्थिक धोरणे आणि शिक्षक-केंद्रित दृष्टिकोन या गुणांमुळे त्यांचे नेतृत्व सर्वमान्य ठरले.
या भव्य कार्यक्रमाचे आयोजन जळगाव पतपेढीचे संचालक सिद्धेश्वर वाघुळदे आणि भुसावळ पतपेढीचे सचिव चेतन तळेले यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमात अनेक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, पतसंस्थांचे अधिकारी आणि तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन पप्पू वानखेडे यांनी केले, तर मनोगत विजय नन्नवरे, सिद्धेश्वर वाघुळदे आणि ललित सुपे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार चेतन तळेले यांनी मानले.
मान्यवरांनी भिरुड सरांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना “शिक्षक संघटनेचा आधारस्तंभ” अशी गौरवपूर्ण उपाधी दिली. शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे सर्वत्र कौतुक झाले. भिरुड सर हे शिक्षक समाजातील प्रेरणास्थान असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
सत्कारानंतर बोलताना एस. डी. भिरुड म्हणाले, “सेवानिवृत्ती म्हणजे थांबणं नव्हे. आता मी पूर्णवेळ शिक्षकांच्या प्रश्नांसाठी काम करणार आहे. शिक्षकांचे हक्क अबाधित राहावेत आणि त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील राहीन. लवकरच यावल तालुक्यात जिल्हास्तरीय सर्व शिक्षक संघटनांचे संमेलन भरवण्यात येईल.” त्यांच्या या विचारांना उपस्थित शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात भुसावल पतपेढीचे संचालक प्रशांत सोनवणे आणि माजी तज्ञ संचालक राकेश महाजन यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, ज्यामुळे कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी भिरुड सरांनी शिक्षकांना “नकारात्मकतेला आळा घालून सकारात्मकता स्वीकारा आणि शिक्षक सन्मान वाढवा” असे आवाहन केले.
या प्रसंगी भुसावल पतपेढीचे माजी अध्यक्ष डी. ए. पाटील, कलाध्यापक संघाचे अध्यक्ष अरुण सपकाळे, गोपाळ महाजन, किरण झांबरे, मनु महाजन, अश्फाक सर, तसेच विविध शाळांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



