मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील लाडक्या बहिणींसाठी भाऊबीजाच्या पार्श्वभूमीवर मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. मध्यप्रदेश सरकारने आपल्या राज्यातील लाभार्थी बहिणींच्या खात्यात भाऊबीजाच्या दिवशी सन्माननिधी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील महिलांनाही ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, योजनेअंतर्गत 1,500 रुपयांऐवजी 2,100 रुपयांचा सन्माननिधी मिळण्याची शक्यता बळावली असून, या निर्णयामुळे लाखो महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.

मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केले आहे की “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना सुरू ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले असून, त्यासाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आणि शासन या माध्यमातून त्यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी कटिबद्ध आहे, असे झिरवळ यांनी सांगितले.

दरम्यान, झिरवळ यांनीच या योजनेतील सन्माननिधी वाढवण्याबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. “गरज पडल्यास सन्माननिधीत वाढ करण्याचा विचार सुरू असून, महिलांना अधिक आर्थिक बळ मिळावे यासाठी सरकार सकारात्मक आहे,” असे वक्तव्य त्यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयोजित सभेत केले. त्यामुळे 2,100 रुपयांचा वाढीव हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात कधी जमा होईल, याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे.
याशिवाय, या योजनेअंतर्गत महिलांना आता कर्ज पुरवठाही सुरू झाला आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दादर शाखेने व्यावसायिक कर्ज योजनेतून 57 महिलांना कर्ज पुरवठा केला आहे. या धनादेशांचे वाटप मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. हा कर्जपुरवठा म्हणजे केवळ आर्थिक मदत नसून, ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या उद्योजकतेला आणि आत्मविश्वासाला दिलेले बळ आहे, असे तटकरे यांनी सांगितले. राज्यातील सर्व लाभार्थी महिलांसाठी ही योजना लवकरच संपूर्णपणे लागू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, “माझी लाडकी बहीण” योजनेच्या ई-केवायसी प्रक्रिया सुद्धा सुलभ करण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी [ladakibahin.maharashtra.gov.in](https://ladakibahin.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर लॉगिन करून e-KYC पर्याय निवडावा. त्यानंतर आधार क्रमांक, कॅप्चा कोड आणि OTP टाकून फॉर्म सबमिट करावा. पुढे पती अथवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून प्रक्रिया पूर्ण करावी.



