जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हातनूर गावात घराच्या बांधकामावर पाणी मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून शेजारी राहणाऱ्या तीन जणांनी एकाच कुटुंबातील सदस्यांना लाकडी फळीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (१८ ऑक्टोबर) रात्री ८ वाजता घडली आहे. या प्रकरणी रविवारी (१९ ऑक्टोबर) मध्यरात्री वरणगाव पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातनूर येथे राहणाऱ्या अर्चना रघुनाथ कोळी (वय ४२) या आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. घटनेच्या दिवशी, त्यांच्या घराच्या बांधकामावर पाणी मारण्याचे काम सुरू होते. याच वेळी शेजारी राहणाऱ्या सविता भीमा सुरवाडे, अतुल भीमा सुरवाडे आणि योगेश अर्जुन सुरवाडे यांना पाणी अंगावर उडाल्याचे कारण पुढे केले. या क्षुल्लक कारणावरून तिघांनी कोळी कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तिन्ही आरोपींनी अर्चना कोळी यांच्यासह त्यांचे दीर आणि सासू यांना लाकडी फळीने मारहाण केली. या मारहाणीत अर्चना कोळी आणि कुटुंबातील इतर सदस्यांना डोक्यावर आणि शरीरावर गंभीर दुखापती झाल्या आहेत.
या घटनेनंतर जखमी कोळी कुटुंबातील सदस्यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानुसार, पोलिसांनी मारहाण करणारे सविता भीमा सुरवाडे, अतुल भीमा सुरवाडे आणि योगेश अर्जुन सुरवाडे या तिघांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. घटनेमुळे हातनूर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल यासीन पिंजारी हे करीत आहेत.



