रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत, गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या एका व्यक्तीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे १६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला कुरेशी मोहल्यातील मस्तान शहा मशिदीजवळ गोवंश मांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख शफिक शेख नसीर (रा. इमाम वाडा) याच्या घरावर छापा टाकला.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून सुमारे १६ हजार रुपये किमतीचे ८० किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले. याव्यतिरिक्त, गोवंश मांस कापण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड, तराजू, वजनकाटा आणि सुरा अशा ५०० रुपये किमतीच्या वस्तूंसह एकूण १६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते, आणि पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सपोनी मीरा देशमुख, उपनि तुषार पाटील, पोलीस शिपाई प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, संभाजी बिजागरे आणि सुकेश तडवी यांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली. गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्यान्वये शेख शफिक शेख नसीर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक कल्पेश आमोदकर हे करीत आहेत.



