रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर पोलिसांनी अत्यंत कुशल आणि तात्काळ कारवाई करत विविध राज्यांतून पाच अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात यश मिळवले आहे. तालुक्यातील विविध गावांमधून अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचे पाच वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सर्व प्रकरणांचा तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
वरिष्ठांच्या आदेशानुसार रावेर पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली. या पथकांनी राज्याबाहेर जाऊन मध्यप्रदेश, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांमध्ये सखोल तपास करून अपहरण झालेल्या मुलींचा मागोवा घेतला. अखेर पथकांना उल्लेखनीय यश मिळत पाचही मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली.

३१ मार्च २०२५ रोजी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार एका अल्पवयीन मुलीचा शोध मध्यप्रदेशातील खकनार येथे लागला. तसेच ६ आणि ७ एप्रिल रोजी नोंदवलेल्या दोन प्रकरणांतील मुली ओडिशा राज्यातील मकापादरा गावात सापडल्या. याशिवाय १५ सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांतील मुलींपैकी एक डमरिया, महू जिल्हा इंदौर (मध्यप्रदेश येथे आणि दुसरी ग्राम बकानी, तालुका झालावाड (राजस्थान) येथे आढळली. सर्व मुलींना पोलिसांनी सुरक्षितरित्या परत आणून त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.
या कारवाईदरम्यान रावेर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संघभावना उल्लेखनीय ठरली. संपूर्ण मोहिमेत सपोनि मीरा देखमुख, पोउपनि मनोज महाजन, पोउपनि तुषार पाटील तसेच पोलीस हवालदार सुनील वंजारी, संभाजी बिजागरे, अतुल गाडीलोहार, विक्रम सिसोदे आणि पूजा साळी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.



