जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील लमांजन गावात मजुरीसाठी वास्तव्याला आलेल्या मध्य प्रदेशातील एका व्यक्तीचा, गिरणा नदीच्या काठावर आंघोळीसाठी गेला असता पाय घसरून बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता ही दुर्घटना घडली. मात्र, रात्रभर शोध घेऊनही मृतदेह न सापडल्यामुळे अखेर बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नदीपात्रातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. जयसींग सुभाष बारेला (वय ४०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, जयसिंग बारेला हा तरूण मध्यप्रदेशातील मूळचा शिरवेल येथील रहिवासी असून, कुटुंबासह लमांजन येथे मजुरीच्या निमित्ताने वास्तव्यास होता. मंगळवारी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता ते गिरणा नदीकाठी आंघोळीसाठी गेले होते. ठरलेल्या वेळेत ते परत न आल्याने त्यांची वृद्ध आई आणि घरी आलेल्या बहिणीला चिंता वाटू लागली. सायंकाळी त्यांनी नदीपात्राच्या परिसरात पाहणी केली असता, नदीच्या किनाऱ्यावर जयसींग यांचे कपडे आणि त्यांचा मोबाईल फोन आढळून आला. यामुळे जयसींग नदीत बुडाल्याचा गंभीर संशय त्यांच्या कुटुंबीयांना आला.

आई व बहिणीने तातडीने ही माहिती लमांजन गावाचे पोलीस पाटील भाऊराव पाटील यांना कळवली. पोलीस पाटलांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांना संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात शोध घेण्यात आला, मात्र अंधारामुळे जयसींग बारेला यांचा शोध लागला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी, बुधवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि गिरणा नदीच्या पात्रातून जयसींग यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे लमांजन गावात हळहळ व्यक्त होत असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



