Home Cities जळगाव जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीत गैरव्यवहारांवर सभासदांचा संताप; आंदोलनाचा इशारा

जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीत गैरव्यवहारांवर सभासदांचा संताप; आंदोलनाचा इशारा

0
147


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेतील चालू असलेल्या विविध अनियमितता, वादग्रस्त ठराव आणि नियमबाह्य निर्णयांविरोधात सभासदांचा संताप तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. ह. दलाल, पी.एस. सोनवणे आणि सिद्धोधन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक सुनील महाजन यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा तुळशीराम सोनवणे यांनी दिला.

पतपेढीच्या नवीन इमारतीतील हॉलला “छत्रपती शिवाजी महाराज सभागृह” हे नाव देण्यात यावे, अशी सभासदांची जोरदार मागणी होती. तसेच, दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या सभेत मंजूर झालेल्या ठरावाविरोधातही रोष व्यक्त करण्यात आला. या ठरावानुसार माजी अध्यक्षांचा मोठा फोटो पतपेढीच्या दर्शनी भागात लावण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या कार्यकाळातील अपहारासंबंधी तक्रारी सहकार न्यायालयात प्रलंबित असल्याने असा सन्मान योग्य नाही, असे सभासदांनी स्पष्ट केले.

महापुरुषांचे फोटो कार्यालयीन अधीक्षकांच्या खोलीत बंदिस्त ठेवलेले असल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली. ते सन्मानपूर्वक दर्शनी भागात लावावेत, अशी विनंती प्रमुख तक्रारदार विनोद महेश्री यांनी केली. याशिवाय, सेवानिवृत्त माजी अध्यक्षांची पतसंस्थेच्या कोणत्याही पदावर नियुक्ती करू नये, अशी मागणी करण्यात आली. त्यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमुळे संस्थेच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो, असे नमूद करण्यात आले.

सभासद सुरेश सिताराम अहिरे यांनी पतपेढीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा ॲक्सेस सध्या माजी अध्यक्षांकडे असल्याची माहिती दिली. हा ॲक्सेस विद्यमान अध्यक्ष सोनम शिवाजी पाटील यांच्याकडे तत्काळ देण्यात यावा, अशी मागणी स्वतंत्र निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच, कार्यालयीन वेळेनंतर कार्यालयात खासगी वाढदिवस समारंभासारखे कार्यक्रम घेण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला. अशा प्रकारामुळे गोपनीयता भंग होण्याची शक्यता असल्याने हे प्रकार तत्काळ थांबवावेत, अन्यथा विद्यमान अधीक्षक आणि संचालक मंडळ जबाबदार राहतील, असा इशारा डॉ. मिलिंद बागुल यांनी दिला.

निवेदन सादरीकरणावेळी माजी उपाध्यक्ष पी.एस. सोनवणे, माजी संचालक प्रा. ह. दलाल, समन्वय समितीचे मार्गदर्शक डॉ. मिलिंद बागुल, कार्याध्यक्ष पी.ए. पाटील, अनिल चव्हाण, अनिल अहिरे, संतोष कचरे, सुरेश अहिरे, डॉ. संजू भटकर, शरद पाटील, के.वाय. फराटे, पी.बी. गायकवाड, अनिल मनोरे, विनोद महेश्री, पी.बी. नरवाडे, प्रेम झंवर आणि सुभाष न्हाळदे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.


Protected Content

Play sound