जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रायपूर गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या भीषण अपघात दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मंगळवारी १४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल भिका बनसोडे वय ३८ रा. रायपूर कुसुंबा ता.जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा गावात सुनिल बनसोडे हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. २ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता सुनिल हा त्याच्या दुचाकीने सुप्रिम कॉलनीतून कुसुंबा मार्गे रायपूर येथे जात असतांना रायपूर गावाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने सुनिलच्या दुचाकीवर धडकली. या भीषण अपघातात सुनिल बनसोडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. यासंदर्भात सुनिल यांची पत्नी रूपाली बनसोडे यांनी एमआयडीसी पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार विलास सुधाकर कोळी रा. कुसुंबा ता. जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.




