Home क्राईम हृदयद्रावक घटना : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा पाण्यात बुडून मृत्यू; दोघे मित्र...

हृदयद्रावक घटना : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा पाण्यात बुडून मृत्यू; दोघे मित्र बचावले !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील नेव्हरे परिसरात असलेल्या नेव्हरे धरणामध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शिरसोली गावावर शोककळा पसरली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

शरद राजाराम सुने (बारी, वय ३१, रा. शिरसोली प्र. न.) असे मयत तरुणाचे नाव आहे. शरद हा एकुलता एक मुलगा होता आणि मजुरी करून आपल्या आई-वडिलांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. कुटुंबाचा तो आधारस्तंभ होता. त्याच्या अचानक जाण्याने सुने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास शरद हा गावातील त्याचे मित्र भिका वसंत शिंपी (वय ४५) आणि अशोक सखाराम भिल (वय ५०) यांच्यासोबत नेव्हरे शिवारातील नेव्हरे धरणात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना पाण्याचा नेमका अंदाज न आल्याने शरद पाण्याच्या खोलवर गेला आणि बुडायला लागला.

हा प्रकार पाहून घाबरलेल्या भिका शिंपी आणि अशोक भिल यांनी तत्काळ गावाकडे धाव घेतली. त्यांनी घडलेली घटना पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना कळवली. बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ तत्काळ धरणाच्या दिशेने धावले. त्यांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने शरदला पाण्यातून बाहेर काढले.

शरदला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. रुग्णालयात उपस्थित असलेल्या शरद सुने यांच्या कुटुंबीयांनी तसेच मित्रांनी या घटनेनंतर केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. शरदच्या निधनाने शिरसोली प्र. न. गावातील उत्साहावर विरजण पडले आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस स्टेशनला करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.


Protected Content

Play sound