
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कुसुंबा परिसरात पुन्हा एकदा दुर्मिळ भारतीय अंडी खाणाऱ्या सापाचा शोध लागल्याने स्थानिकांमध्ये उत्सुकता आणि थोडी भीती दोन्ही पसरली आहे. या दुर्मीळ सापाला स्थानिक सर्पमित्र मंदार वाढे यांनी सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केल्याने सर्पप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांत कौतुकाची लाट उसळली आहे.

घटना जळगाव शहरालगत असलेल्या कुसुंबा गावातील स्टेट बँकेच्या मागील भागातील एका रहिवाशाच्या घरात रात्री घडली. घरामध्ये साप दिसल्याच्या माहितीवरून सर्पमित्र मंदार वाढे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अत्यंत कुशलतेने या दुर्मीळ सापाला पकडले आणि कोणतीही हानी न करता नैसर्गिक अधिवासात सोडले.
हा साप भारतीय “एग ईटर” म्हणून ओळखला जातो. तो विषारी नसून माणसाला धोका पोहोचवत नाही, मात्र त्याच्या दुर्मिळतेमुळे त्याचे पर्यावरणीय महत्त्व अधिक आहे. काही वर्षांपूर्वी या सापाची नोंद केवळ विदर्भातील अमरावती परिसरात झाली होती. मात्र, अलीकडील काळात जनजागृतीमुळे जळगाव परिसरात अशा दुर्मिळ प्रजातींच्या सापांची उपस्थिती अधोरेखित केली जात आहे.
या अंडी खाणाऱ्या सापाची शिकार करण्याची पद्धतही विलक्षण आहे. तो लहान पक्षांची अंडी गिळतो आणि त्याच्या जबड्याच्या वरच्या भागातील हाडाचा फुगीर भाग अंड्याला दाबून फोडतो. अंड्यातील द्रव पदार्थ पोटात जातो तर कवचाची शाबूत गोळी तो बाहेर टाकतो. ही नैसर्गिक प्रक्रिया सर्पप्रेमींसाठी अभ्यासाचा विषय ठरते.
ज्येष्ठ सर्पतज्ञ नीलम कुमार खैरे यांच्या नोंदीनुसार, या सापाची भारतात फारशी नोंद आढळत नाही. त्यामुळे जळगाव परिसरात याचा आढळ हा स्थानिक जैवविविधतेसाठी एक सकारात्मक संकेत मानला जात आहे.



