Home Cities अमळनेर न्यायालयासमोर दुचाकी लांबविणाऱ्या सराईत चोरट्याला अटक !

न्यायालयासमोर दुचाकी लांबविणाऱ्या सराईत चोरट्याला अटक !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। अमळनेर येथील न्यायालयाच्या पार्किंगमधून चोरीला गेलेली एक एचएफ डीलक्स मोटारसायकल अमळनेर पोलिसांनी माहिती मिळाल्यापासून अवघ्या चार तासांत हस्तगत करून आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, चोरी करणारा आरोपी हा त्याच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या एका तारखेसाठी न्यायालयात आला असताना, त्याने ‘मास्टर की’ वापरून चोरी केल्याचे उघड झाले आहे.

काय आहे प्रकरण?
चोपडा तालुक्यातील गणपूर येथील रहिवासी जयपाल इंदरसिंग राजपूत (वय ४२) हे ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या मित्रासोबत आपल्या कायदेशीर कामासाठी अमळनेर येथील न्यायालयात आले होते. त्यांनी आपली एचएफ डीलक्स मोटारसायकल (क्रमांक MH 19 DP 4541) न्यायालयाच्या गेटजवळील पार्किंगमध्ये लावली होती. मात्र, कामकाज आटोपून परत आल्यावर त्यांना त्यांची मोटारसायकल जागेवर दिसली नाही. त्यांनी तातडीने अमळनेर पोलीस ठाण्यात या चोरीची तक्रार दाखल केली.

पोलिसांची तत्परता:
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद संनदनशिव, उदय बोरसे यांचे पथक नेमले. या पथकाने तातडीने मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला आणि अवघ्या चार तासांत मोटारसायकलसह आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपीचा ‘न्यायालय कनेक्शन’:
चोरी करणारा आरोपी धनंजय रवींद्र पाटील (रा. विद्यानगरी, देवपूर, धुळे) हा याच दिवशी त्याच्यावरील कौटुंबिक हिंसाचाराच्या एका प्रकरणाच्या तारखेसाठी न्यायालयात आला होता. त्याने ‘मास्टर की’ (बाबी) च्या मदतीने मोटारसायकलचे लॉक उघडून ती चोरून धुळ्याकडे घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला पकडले. याच आरोपीने यापूर्वी धरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बुलेट मोटारसायकलची चोरी केली होती आणि धरणगाव पोलिसांनी त्याला तेव्हाही अटक केली होती.

पोलीस निरीक्षकांचे आवाहन:
या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी नागरिकांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “दिवाळीच्या काळात अनेक कुटुंबे बाहेरगावी जातात. अशावेळी घरात रोख रक्कम किंवा मौल्यवान दागिने ठेवू नये. तसेच, नागरिकांनी आपल्या घरी आणि कॉलनीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, जेणेकरून परिसराची सुरक्षा राखता येईल,” असे आवाहन त्यांनी केले आहे.


Protected Content

Play sound