जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील ऑटो रिक्षा चालकांच्या मागण्या लक्ष्यात न घेतल्याने अखेर चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या मुंबईतील राज्यव्यापी बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनामुळे राज्यभरात वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.

मुंबईतील ठाकूरद्वार येथे पार पडलेल्या या बैठकीत राज्यभर टप्प्याटप्प्याने चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. उत्तर महाराष्ट्रात हे आंदोलन जळगावमध्ये होणार असून, इतर विभागीय केंद्रांवरही ते नियोजनबद्ध रित्या राबवले जाईल. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा. शशांक राव होते, तर त्यांच्या समवेत सरचिटणीस विलास भालेकर, खांदेश विभागाचे कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, मुंबई विभागाचे मारूती कोंडे, मराठवाडा विभागाचे अहमद बाबा, सल्लागार शंकरजी साळवी आणि प्रवक्ता इमरान पठाण यांच्यासह राज्यभरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत रिक्षा चालकांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली. विशेषतः स्व. आनंद दिघे ऑटो रिक्षा आणि मिटडी टॅक्सी कल्याणकारी मंडळातील त्रुटी दूर करणे, महामंडळाची सदस्यता फी रद्द करणे, आणि त्याचे फायदे स्पष्ट करणे, तसेच छुप्या पद्धतीने फोटो काढून पाठवले जाणारे चालान थांबवणे यावर जोर देण्यात आला. याशिवाय, याआधी पाठवलेली सर्व चालान रद्द करण्याची मागणीही करण्यात आली.
ई-बाईक टॅक्सी सेवेला परवानगी दिल्यामुळे ती ऑटो रिक्षा चालकांच्या उपजीविकेवर घात करणारी आहे, असे मत संघटनेने नोंदवले. ई-बाईक आणि ई-रिक्षा यांच्यावर परवाने आणि नियमानुसार बंधने लावावीत, अशीही ठाम भूमिका घेण्यात आली. जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील अवैध वाहतुकीवर बंदी घालण्याचीही मागणी यावेळी मांडण्यात आली.
कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी उत्तर महाराष्ट्रातील रिक्षा चालकांच्या अडचणी समितीसमोर मांडल्या. त्यांनी सांगितले की, एकाच आंदोलनात सर्व मागण्या मान्य होणार नाहीत, पण या चळवळीमुळे सरकारला जाणीव होईल की आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आहोत. यावर सभाध्यक्ष शशांक राव म्हणाले की, टप्प्याटप्प्याने हे आंदोलन राज्यभर राबवले जाईल आणि त्यासाठी संघटनांनी तयारी ठेवावी.
विलास भालेकर यांनी कल्याणकारी मंडळाच्या लढ्याचा आढावा घेत सांगितले की, हा लढा एका महिन्याचा नव्हे, तर गेल्या वीस वर्षांपासून सुरू आहे. आजही संपूर्ण लाभ मिळालेला नाही. कल्याणकारी मंडळ खरेच कल्याणकारी व्हायचे असेल, तर त्याचे फायदे प्रत्यक्षात रिक्षा चालकांच्या जीवनात उतरले पाहिजेत.
या बैठकीत विजय पाटील, प्रकाश साखरे, राहूल वारे, सिताराम तामाणी, ओमिन शेख, किशन मिरेकर, नाना वैध, अजय रामटेके, निजामुद्दीन शेख, ज्ञानेश्वर कोळी, श्रीरंग जाधव, नामदेव जगताप, रंजनाताई चव्हाण, महमद मोसिन, प्रमोद वाणी, किशोर खरताडे, किरण गवळी, तसलीम खान, फकिरा चव्हाण, भुषण वाणी, पद्मनाभ गिते, सतिष वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आता संपूर्ण राज्यात ऑटो रिक्षा चालक आंदोलनाच्या तयारीला लागले असून, सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



