जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गांधी रिसर्च फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ रॉयल आणि इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिरसोली येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत दंत तपासणी शिबिराला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण २०० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून, शिबिरातून दंत आरोग्याविषयी जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.

बारी समाज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आयोजित या शिबिरात रोटरी क्लब रॉयलचे अध्यक्ष जितेंद्र भोजवानी, जितूलाल रोटे, डॉ. जयदीपसिंह छाबडा, डॉ. बिंदू छाबडा, डॉ. वर्षा रंगलानी, डॉ. स्नेहल महाजन यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून मार्गदर्शन केले. तपासणीसोबतच विद्यार्थ्यांना दातांची स्वच्छता, ब्रश करण्याची योग्य पद्धत, आणि पोषक आहार याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.

शिबिरादरम्यान आरोग्यविषयक लघुनाटिका सादर करून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली गेली. डॉ. ज्योत्सना पाटील यांनी ‘व्यसनांचे दुष्परिणाम’ या विषयावर प्रभावी माहिती देत तंबाखू, गुटखा, सुपारी यासारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्व पटवून दिले. रोटरी क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना ब्रश आणि बिस्किट वाटप करण्यात आले.
दातांच्या उपचाराची गरज भासणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचवण्यासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे स्वयंसेवक विक्रम अस्वार, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण काटोले, श्रावण ताडे आणि मुदतसर पिंजारी प्रयत्नशील राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत सुर्यवंशी यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर व शिक्षक वृंद यांनी संपूर्ण शिबिराचे व्यवस्थापन समर्थपणे सांभाळले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये दंत आरोग्याची जाण निर्माण झाली असून, त्यांच्या दैनंदिन स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. ग्रामस्तरावर अशा उपक्रमांची गरज अधोरेखित करत, शिबिराचे कौतुक होत आहे



