
धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू असून, त्याच पार्श्वभूमीवर धरणगाव नगरमध्ये यंदाचा विजयादशमी उत्सव विशेष उत्साहात साजरा होणार आहे. संघाच्या सहा महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक असलेल्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन यंदा अधिक भव्य स्वरूपात करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत प्रथम पथसंचलन गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे. सकाळी ७ वाजता बालाजी नगर येथील बालाजी मंदिराच्या मागे स्वयंसेवकांचे एकत्रीकरण होईल. त्यानंतर निश्चित मार्गावर शिस्तबद्ध आणि आकर्षक पथसंचलन पार पडेल. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांनी पथसंचलन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या माध्यमातून संघ स्वयंसेवक संघटनेचे सशक्त दर्शन घडवतात.
यासोबतच विजयादशमी उत्सवाचा मुख्य कार्यक्रम रविवार, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजता पी. आर. हायस्कूल, धरणगाव येथे होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्त्या सौ. वैशाली नितीन पवार उपस्थित राहणार असून, प्रमुख वक्ते म्हणून श्री. प्रशांत प्रकाश देवरे, प्रांत कार्यकारिणी सदस्य, हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमामध्ये संघ कार्याचा आढावा, संस्कारक्षम भारताच्या दृष्टीने विचारमंथन, आणि विविध सांघिक सादरीकरणे सुद्धा अपेक्षित आहेत.
संघाच्या शताब्दी वर्षात होणारा हा पहिला विजयादशमी उत्सव असल्याने स्वयंसेवक आणि नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता असून, आयोजकांनी उत्सवाची जय्यत तयारी केली आहे. स्थानिक पातळीवर संघाची वैचारिक व सामाजिक भूमिका अधोरेखित करणारा हा उत्सव अनेकांच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरणार आहे.



