जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात सोमवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे उद्भवलेल्या या आगीवर विभागातील अधिपरिचारिका ज्यूलीना पिंपळसे आणि सुवर्णा पुरी यांनी अतिशय प्रसंगावधान राखत अग्निशामक यंत्रांचा वापर करून नियंत्रण मिळवले. त्यांच्या धाडसपूर्ण व तत्पर कृतीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दोन्ही परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

प्रसंगी, रुग्णालयातील प्रसुतीपूर्व दाखल कक्ष क्रमांक ६ मध्ये अनेक गर्भवती महिला व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. सकाळी १२.२० वाजता मुख्य दरवाज्याजवळील स्विचबोर्डजवळ अचानक स्पार्किंग होऊन आग लागली. घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ अधिपरिचारिका ज्यूलीना पिंपळसे आणि सुवर्णा पुरी यांना माहिती दिली. दोघींनीही विलक्षण प्रसंगावधान दाखवत त्वरित विभागातील दोन अग्निशामक यंत्र हाताळले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

या दरम्यान त्यांनी परिसरातील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि तातडीने विद्युत विभागाशी संपर्क साधून पुढील धोका टाळला. त्यांच्या धाडसी कृतीमुळे रुग्णालयातील इतर कर्मचारी, रुग्ण आणि उपस्थित नातेवाईक यांच्यात घबराट पसरली नाही.
घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी स्वतः याची दखल घेत ज्यूलीना पिंपळसे आणि सुवर्णा पुरी यांना दालनात बोलावले. त्यांना पुष्पगुच्छ देत गौरव करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, सहयोगी प्राध्यापक डॉ. संगीता गावित आणि सहायक अधिसेवक तुषार पाटील उपस्थित होते.
अशा आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवकांनी दाखवलेली तत्परता ही रुग्णालयासाठी आदर्शवत ठरते. अग्निशमन यंत्रणा योग्य प्रकारे हाताळल्यामुळे आणि रुग्णांची घबराट न होऊ देता परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. प्रशासनाकडूनही अशा कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी कौतुक होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.



