गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात एआयवर व्याख्यान; विद्यार्थ्यांनी गिरविले कृत्रिम बुद्धिमत्तेचे धडे

0
153


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जगभरात झपाट्याने विकसित होत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील संधी, आव्हाने आणि त्याचा स्टार्टअप्समधील उपयोग यावर प्रकाश टाकण्यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी यामधून केवळ तांत्रिक ज्ञानच नाही, तर प्रत्यक्ष स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली दिशा आणि प्रेरणाही मिळवली.

या कार्यक्रमाचे आयोजन अपेक्स स्टार्टअप ग्रुपच्या सहकार्याने करण्यात आले होते. “AI चे महत्त्व आणि भावी संधी” या विषयावर झालेल्या व्याख्यानात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपले अनुभव आणि ज्ञान विद्यार्थ्यांशी खुलेपणाने शेअर केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन व गोदावरी आजींच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटरचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. आनंद शाक्य, एंजल इन्वेस्टर व लेखक कमलेश भगतकर, अपेक्स स्टार्टअपचे संस्थापक अजिंक्य तोतला, खान्देश इनक्युबेशनचे सीईओ सागर पाटील, अधिष्ठाता प्रा. तुषार कोळी हे व्यासपीठावर उपस्थित होते.

अजिंक्य तोतला यांनी त्यांच्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना स्टार्टअप्सच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा दिली. त्यांनी अपयशातून शिकून यशाच्या दिशेने कशी वाटचाल करता येते, याबाबत थेट उदाहरणांद्वारे मार्गदर्शन केले. स्थानिक स्तरावर स्टार्टअप्स उभारण्याची गरज आणि संधी यावरही त्यांनी स्पष्ट विचार मांडले.

सागर पाटील यांनी इनक्युबेशन सुविधा, उद्योग मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य आणि नेटवर्किंग याबाबत माहिती देत विद्यार्थ्यांना व्यवसायिक जगतात प्रवेश कसा करावा, याचे मार्गदर्शन केले. डॉ. आनंद शाक्य यांनी अवकाश संशोधन आणि GIS, Remote Sensing सारख्या आधुनिक क्षेत्रात एआयचा कसा वापर होतो, तसेच त्यामधील करिअर संधी यांची सखोल माहिती दिली.

कमलेश भगतकर यांनी स्टार्टअप्स आणि AI यांची सांगड घालत देशाच्या विकासात युवाशक्तीची भूमिका अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, एआयचा योग्य वापर केल्यास भारताच्या डिजिटल भविष्यात तरुणांचा निर्णायक वाटा असणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तुळजा महाजन या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन आणि यशस्वी अंमलबजावणीबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, तसेच डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ अकादमिक ज्ञानच नाही, तर प्रत्यक्ष उद्योग आणि तंत्रज्ञानाशी जोडलेले अनुभव मिळाले. कृत्रिम बुद्धिमत्ता या नव्या क्रांतीतून भविष्यातील करिअर घडवण्याची दिशा या व्याख्यानातून निश्चितपणे मिळाली.