जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२५ निमित्त नागपूर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची अपेक्षा असून, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून विविध मार्गांवर विशेष अनारक्षित रेल्वे गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पुणे, नाशिक, मुंबई, सोलापूर, भुसावळ, अकोला येथून नागपूरकडे जाणाऱ्या आणि परतीच्या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा नागपूर येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानिमित्त दरवर्षी लाखो भाविक नागपूर येथे दाखल होतात. यंदा भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे.

या विशेष गाड्यांमध्ये पुणे-नागपूर (01215/01216), नाशिक रोड-नागपूर (01217/01224/01226), मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर (01019/01020), नागपूर-अकोला (01132/01131), भुसावळ-नागपूर (01213/01214), आणि सोलापूर-नागपूर (01029/01030) या मार्गांवरील गाड्यांचा समावेश आहे. सर्व गाड्या अनारक्षित असून, सामान्य प्रवाशांसाठी उपयुक्त असतील.
प्रत्येक गाडीच्या वेळा, थांबे आणि संरचनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अनेक गाड्यांमध्ये १६ सामान्य द्वितीय श्रेणी डबे व २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे, तर काही गाड्या ८-कार मेमू म्हणून चालवण्यात येणार आहेत. गाड्यांचे थांबे दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, अजनी इत्यादी स्थानकांवर आहेत.
धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि सुरक्षित प्रवास मिळावा, या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने हे विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. या गाड्यांच्या वेळांबाबत अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ‘NTES’ अॅपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



