Home Cities जळगाव १५ दिवसांत रस्ता दुरुस्ती करा अन्यथा कार्यालय फोडू ! — प्रा. भाऊसाहेब...

१५ दिवसांत रस्ता दुरुस्ती करा अन्यथा कार्यालय फोडू ! — प्रा. भाऊसाहेब सोनवणे 

0
172

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  कानळदा भोकर जिल्हा परिषद गटात रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करत ठेकेदार व प्रशासनाच्या निष्क्रियतेचा खरपूस समाचार घेतला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे आणि तालुका प्रमुख प्रमोदभाऊ घुगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्ते रस्त्यावर पाण्याने भरलेल्या गड्यांत बसले आणि थेट होळी साजरी करत “गड्ड्यातच विकास आहे का?” असा सवाल प्रशासनाला केला.

नंदगाव, फेसर्डी, पिलखेडा आणि नांद्रा बुद्रुक या सुमारे ९ किलोमीटरच्या रस्त्याचे काम भ्रष्ट ठेकेदाराकडून अपूर्ण ठेवले गेले असून, केवळ कागदोपत्री निधी उचलण्यात आला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला. अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम प्रलंबित असून, या मार्गावरून शाळकरी मुलं, रुग्ण आणि शेतकरी रोज जीव मुठीत धरून प्रवास करतात.

हे आंदोलन पिलखेडा ते फेसर्डी रस्त्यावर टोल काट्या जवळ करण्यात आले. ठिकठिकाणी पाणी साचलेल्या रस्त्यात बसून शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. या आंदोलनात भगवान भाऊ धनगर, प्रभाकर कोळी, धनराज वारडे, सुनील भाऊ सोनवणे, शैलेशभाऊ चौधरी, राजू दादा नवाल, आतिशभाऊ चौधरी, देवाभाऊ सपकाळे, गोपाल जाधव, विजय सोनवणे, शांताराम पाटील, लोटन सोनवणे आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या वेळी प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी थेट इशारा दिला की, “येत्या पंधरा दिवसांत या रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) कार्यालय फोडून टाकू!” या थेट आणि रोखठोक वक्तव्यामुळे प्रशासकीय पातळीवर खळबळ माजली आहे.

रस्त्याच्या कामासाठी मंजूर निधीचा अपहार झाला असल्याचा आरोप करत नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. रस्त्याच्या अभावामुळे शेतमाल वाहतुकीला अडथळा येत आहे, तसेच रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसल्याने जीवितहानीचाही धोका निर्माण झाला आहे.

या आंदोलनामुळे प्रशासनाच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील जनता आता गप्प बसणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. भ्रष्टाचार, दुर्लक्ष आणि हलगर्जीपणाच्या विरोधात सामान्य नागरिक उभे ठाकले असून, या आवाजाची दखल घेणे आता प्रशासनासाठी अपरिहार्य झाले आहे.


Protected Content

Play sound