जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव येथील मुलींच्या वसतिगृहात दिनांक १२ सप्टेंबर २०२५ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव यांच्या वतीने योग व निसर्गोपचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने हे सात दिवसांचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या योग शिबिरामध्ये सोहम विभागाच्या योग प्रशिक्षिका सौ. रजनी रामदास मडावी यांनी विद्यार्थिनींना योगाचे वैयक्तिक जीवनातील महत्त्व, नियमित योगाभ्यासाचे फायदे, मानसिक व शारीरिक आरोग्याशी असलेले नाते इत्यादी विविध अंगांनी मार्गदर्शन केले. योगाचा अनुभव प्रत्यक्ष कृतीतून देत त्यांनी विद्यार्थिनींमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली. योगाचे शास्त्रीय व जीवनशैलीशी सुसंगत पैलू अत्यंत सोप्या पद्धतीने त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमासाठी सोहम विभागाचे संचालक प्रा. डॉ. देवानंद सोनार व मार्गदर्शिका प्रा. डॉ. ज्योती वाघ यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सोहम विभागाचे प्रा. पंकज खाजबागे, शासकीय तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रसाद चौधरी, कुलमंत्री प्रा. डॉ. संतोष शेळके, प्रा. डॉ. चैताली पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये सोहम विभागातील सहप्रशिक्षिका कीर्ती काटे, स्नेहांकिता पाटील, शितल वाडेकर, मीनल इंगळे आणि सुवर्णा क्षीरसागर यांनी मोलाचे योगदान दिले. विद्यार्थिनींनी सात दिवसांच्या या शिबिरात नियमित सहभाग नोंदवत विविध योगासनांचा सराव केला व आरोग्यविषयी सकारात्मक दृष्टीकोन विकसित केला.
या उपक्रमातून विद्यार्थिनींना केवळ योगाचे ज्ञानच मिळाले नाही, तर निसर्गोपचाराच्या मूळ संकल्पनाही आत्मसात करण्याची संधी मिळाली. महाविद्यालयीन जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्यासाठी या शिबिराचा लाभ होणार असल्याचे अनेक विद्यार्थिनींनी सांगितले.



