जालना-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. पुराच्या पाण्याने गावांचे गाव उद्ध्वस्त झाले असून हजारो लोक बेघर झाले आहेत. या कठीण परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांनी मुंबई-पुण्यात राहणाऱ्या मराठी कलाकारांना मदतीसाठी भावनिक साद घातली आहे. त्यांनी एका पोस्टद्वारे सर्व कलाकारांना मराठवाड्यातील पूरग्रस्तांना हात देण्याचे आवाहन केले आहे.

सध्या धाराशिव, बीड, लातूर आणि इतर अनेक भागांमध्ये पावसाने कहर केला आहे. नद्यांना पूर आल्याने गावांत पाणी शिरले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतपिकं पूर्णतः पाण्याखाली गेल्याने उदरनिर्वाहाचा मार्गही खुंटला आहे. अनेकांना शासकीय मदतीची वाट बघावी लागत आहे. अन्नधान्य, औषधे, कपडे आणि निवारा यांसारख्या मूलभूत गरजांवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मराठी कलाकारांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. “सोनू सूद जसा पंजाबच्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावला, तितकं नको पण निदान फुलाच्या पाकळीइतकी तरी मदत आपल्या मराठवाड्याला करा,” अशा शब्दांत त्यांनी कलाकारांच्या संवेदनांना स्पर्श केला. त्यांनी हेही नमूद केले की, “आज ज्या भूमीने आपल्याला फाळके पुरस्कारापासून ते महाराष्ट्र भूषण पर्यंत पोहोचवलं, त्या मातीतच आज हाहाकार माजला आहे.”
त्यांनी पुणे आणि मुंबईतील सर्व मराठी सिने अभिनेते, गायक, शाहीर, साहित्यिक आणि रंगभूमीवरील कलाकारांना या संकटात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र यावं, अशी विनंती केली. “ही मदत केवळ आर्थिक नसून, मानसिक आधाराचीदेखील गरज आहे,” असं त्यांनी ठामपणे म्हटलं.
मराठवाडा हा अनेकदा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. मात्र यंदा या प्रदेशात महापूर येऊन संपूर्ण जनजीवन उध्वस्त झालं आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे संकट अधिक वाढण्याची भीती आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी कार्यकर्ते या आपत्तीत पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. पण पुरेशा प्रमाणात मदत पोहोचवण्यासाठी बाह्य सहकार्य अत्यावश्यक आहे.
अमोल मिटकरींच्या या भावनिक आवाहनाला आता किती कलाकार प्रतिसाद देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. परंतु या सादेने एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा समोर आणला आहे — की जेव्हा संकट येतं, तेव्हा सामाजिक एकोप्याचं खरे रूप समोर येतं.



