जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात प्रवाशांसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले असून, जिल्ह्याच्या वाहतूक सेवेत आधुनिकतेची भर पडली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज १३ वातानुकूलित ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पण सोहळ्याचा थाटात कार्यक्रम पार पडला. या लोकार्पण सोहळ्याला जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल आणि आमदार राजू मामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापराने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ, पर्यावरणपूरक आणि प्रवाशांसाठी सोयीची व्हावी, या उद्देशाने ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या सर्व बस वातानुकूलित असून, प्रवाशांसाठी “पुष्पक सीट” नावाची आरामदायक व आलिशान आसनव्यवस्था देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सुखद व दर्जेदार ठरणार आहे.

या बससेवेचा लोकार्पण सोहळा जळगाव शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बसमध्ये बसून प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि प्रवासाच्या सोयींसंदर्भात माहिती घेतली. ‘शिवाई’ बस सेवा ही फक्त पर्यावरणपूरक पर्यायच नाही, तर ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना एक नवी सुविधा देणारी क्रांतिकारी पायरी असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
या प्रसंगी लाईव्ह ट्रेंड्सशी संवाद साधताना जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी सांगितले की, “हळूहळू जिल्ह्यातील इतर मार्गांवरही अशाच प्रकारच्या स्मार्ट आणि हरित बससेवा सुरू करण्याचा आमचा मानस आहे.” तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी या उपक्रमाला जिल्हा परिषदेचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे नमूद केले. आमदार राजू मामा भोळे यांनी या बससेवेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी किरकोळ दरात दर्जेदार सेवा, पर्यावरण संरक्षणात हातभार आणि शहरात वाहतुकीचा बोजा कमी होणार असल्याने ‘शिवाई’ बस सेवा जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.



