अहिल्यानगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ओबीसी आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे आणि विविध आंदोलनांतून ओबीसी समाजासाठी आवाज उठवणारे लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर आज सकाळी पाथर्डी तालुक्यात अज्ञात जमावाने हल्ला केला. ही धक्कादायक घटना आरनगाव येथील बाह्यवळण रस्त्याजवळ घडली असून, हल्लेखोरांनी काठ्यांनी गाडीवर अचानक हल्ला चढवून वाहनाची काचफोड केली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

लक्ष्मण हाके हे आज दैत्यानांदूर (ता. पाथर्डी) येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेसाठी जात असताना त्यांनी अहिल्यानगरजवळ नाश्ता करण्यासाठी थांबले होते. नाश्ता करून पुढे प्रवास सुरू करताच आरनगावजवळ काही अज्ञात तरुणांनी त्यांची गाडी अडवली आणि अचानक काठ्यांनी हल्ला केला. या अचानक हल्ल्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले असून गाडीच्या समोरील व बाजूच्या काचा फोडण्यात आल्या. सुदैवाने लक्ष्मण हाके यांना कोणतीही शारीरिक इजा झाली नसल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.

हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसल्यामुळे हा हल्ला राजकीय प्रेरित की वैयक्तिक आकसातून झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या घटनेनंतर लक्ष्मण हाके यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट शेअर करत या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपली व्यथा मांडली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी प्रामाणिकपणे ओबीसीसाठी लढतोय, समाज एकत्र येण्यासाठी प्रयत्न करतोय, पण त्यामुळे शत्रू वाढले. हल्ले झेलतोय, पण आता सहन होत नाही.” या पोस्टमधून त्यांच्या मनातील अस्वस्थता आणि आंदोलनातील भावनिक गुंतवणूक स्पष्ट दिसून येते. त्यांनी उद्या होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर आपल्या पुढील भूमिकेची घोषणा करणार असल्याचेही सांगितले आहे.
लक्ष्मण हाके हे मागील काही वर्षांपासून ओबीसी, भटके-विमुक्त आणि इतर मागासवर्गीय घटकांसाठी आंदोलने करत असून, राज्यभरात त्यांचा समर्थक वर्ग मोठा आहे. अशा नेत्यावर थेट हल्ला होणं ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब मानली जात आहे. अनेक समर्थक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून या हल्ल्याचा निषेध केला असून, पोलिसांनी तत्काळ दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही सुरू झाली आहे.



