Home Cities जळगाव कृषी विभागाला पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश !

कृषी विभागाला पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश !

0
344

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृहात महावितरण आणि कृषी विभागाच्या कामांचा महत्त्वपूर्ण आढावा घेण्यात आला. ढगफुटी सदृष्य पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसाग्रस्त भागात तातडीने पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प. सीईओ मीनल करणवाल, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच आ. राजूमामा भोळे, आ. अमोल जावळे, आ. अमोल पाटील आणि आ. चंद्रकांत सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महावितरण कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत
आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी महावितरणच्या कामात हलगर्जीपणा आढळल्यास सख्त कारवाईचे संकेत दिले. त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, जे वायरमन आणि लाईनमन मुख्यालयाच्या ठिकाणी थांबत नाहीत, त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करावी. तसेच, नुकताच धरणगाव तालुक्यात वीजेच्या खांब्यावरून पडून मृत्यू झालेल्या ‘झिरो वायरमन’चा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.

चोरीच्या तारा परत करण्याची मागणी
अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी जिल्ह्यात सुमारे ५०० किलोमीटरपर्यंतच्या वीजेच्या तारांची चोरी झाली असून, यातील आरोपींना अटक केल्याची माहिती दिली. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विनंती केली की, जप्त केलेल्या या तारा न्यायालयामार्फत लवकरात लवकर महावितरणला परत करण्यात याव्यात, जेणेकरून प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावता येतील. आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी मुक्ताईनगर भागातील महावितरणची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली.

शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पशुधनाचे पंचनामे
पालकमंत्र्यांनी कृषी विभागाचे अधिकारी कुर्बान तडवी यांना शेतकऱ्यांसाठी प्रलंबित असलेले पंचनामे आणि तत्सम कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

याशिवाय, अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाईवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्र्यांनी सीईओ मीनल करणवाल यांना सूचना दिल्या की, आता पंचनामे करणे शक्य नसल्याने, पशुधनाच्या लसीकरणाच्या नोंदी तपासून त्या आधारावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. सीईओ करणवाल यांनी संबंधित पशु अधिकाऱ्यांना तसे आदेश देण्याचे आश्वासन दिले.


Protected Content

Play sound