
फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिव्यांग आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी दिव्यांग व सामाजिक बहुउद्देशीय संस्था पिंपरूड (रजि.) – राहुल कोल्हे सामाजिक मित्र परिवार यांच्या वतीने फैजपूर येथे एक विशेष सन्मान व साहित्य वितरण सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक न्याय, शिक्षण आणि समावेशिता यांना एकत्र जोडणारा सुंदर मेळ पहायला मिळाला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त पोलीस उपआयुक्त दिलीप सूर्यवंशी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भरतभाऊ महाजन, फैजपूरचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, निंभोऱ्याचे हरिदास बोचरे, सावद्याचे विशाल पाटील, नायब तहसीलदार जगदीश गुरव, मुख्याध्यापक प्रकाश भालेराव व बी. एम. बोंडे, पत्रकार उमाकांत पाटील, तलाठी स्वेता ससाणे यांचीही विशेष उपस्थिती होती.
फैजपूर येथील कुसुमताई माध्यमिक विद्यालय, म्युनिसिपल माध्यमिक हायस्कूल, घ.का. विद्यालय आमोदा, शकुंतला जीवराम महाजन विद्यालय, भारत विद्यालय न्हावी, आ.ग. हायस्कूल, नूतन माध्यमिक विद्यालय यातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, पेन व पुस्तक देऊन गौरवण्यात आले. या विद्यार्थ्यांमध्ये ईशिका जैन, भार्गवी पाटील, पार्थ गाजरे, चंचल साळी, सानिया चौधरी, अवंतिका तायडे, चारुलता सरोदे, जागृती सोनवणे, देवेश नेहेते यांचा समावेश होता. यासोबतच शिक्षक व ग्रंथपाल म्हणून कार्यरत असलेल्या विद्यार्थी मित्रांचाही सन्मान करण्यात आला.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त सहाय्य साधनांचेही वितरण या कार्यक्रमात करण्यात आले. फालगुनी धनगर हिला कर्णयंत्र, निलोफर तडवी व आकांक्षा चौधरी यांना व्हीलचेअर, सचिन वायकोळे यांना ब्लाइंड स्टिक, काशिम पिंजारी यांना शालेय साहित्य देण्यात आले. सं.गा. योजना मंजुरीचे पत्र नरेंद्र टोके आणि आकांक्षा चौधरी यांना प्रदान करण्यात आले.
प्रमुख पाहुणे दिलीप सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत सांगितले की, “ही संस्था नेहमीच सामाजिक भान ठेवून निस्वार्थ भावनेतून कार्यरत असते. दरवर्षी पत्रकार दिन आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करणे ही त्यांची संस्कृतीच बनली आहे.” पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, रामेश्वर मोताळे आणि विशाल पाटील यांनीही संस्थेच्या कार्याबद्दल प्रशंसेचा सूर आळवला. संस्थेचे कार्य वटवृक्षासारखे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आणि महाराष्ट्रभर त्याचा प्रभाव वाढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमात मुख्याध्यापक प्रकाश भालेराव, बी.एम. बोंडे यांच्यासह इतर मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. सूत्रसंचालन पत्रकार संजय सराफ यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष मुन्ना चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मार्गदर्शक राहुल कोल्हे, उपाध्यक्ष चेतन तळेले, सचिव विशाल दांडगे, सदस्य पराग वारके, भगवान कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.



