नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सहकार क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘सहकारिता विभूषण’ पुरस्कार २०२४-२५ यंदा जळगावच्या शैलजादेवी दिलीप निकम यांना प्रदान करण्यात आला असून या राष्ट्रीय सन्मानामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (कृभको) तर्फे दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार यंदा देशभरातून फक्त दोन व्यक्तींना देण्यात आला असून त्यापैकी एक म्हणून शैलजादेवी निकम यांची निवड झाली आहे.

हा पुरस्कार समारंभ कृभकोच्या ४५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने २५ सप्टेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथील प्रतिष्ठित अशोका हॉटेल, चाणक्यपुरी येथे पार पडला. या सोहळ्यात सहकार क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी जमली होती. कृभकोचे अध्यक्ष व्ही. सुधाकर चौधरी, एशिया पेसिफिकचे संचालक चंद्रपालसिंग यादव, इफकोचे चेअरमन दिलीप सिंघानिया, एनसीसीएफचे चेअरमन विशाल सिंग, माजी केंद्रीय कृषी मंत्री मोहनभाई कुंडारिया आणि कृभकोचे व्यवस्थापकीय संचालक एस. एस. यादव यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

या पुरस्काराद्वारे शैलजादेवी निकम यांचे सहकारी चळवळीत दिलेले योगदान, महिलांना सक्षम करण्यासाठी केलेले कार्य, आणि ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविण्याचे प्रयत्न यांचे कौतुक करण्यात आले. त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कृभकोने त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत दिलेला हा पुरस्कार संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरली आहे.
शैलजादेवी निकम यांना पुरस्कार मिळाल्यानंतर सहकार, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू असून त्यांच्या कार्याची दखल घेत अनेकांनी त्यांचे समाजासाठी प्रेरणास्थान असल्याचे गौरवोद्गार काढले आहेत. त्यांच्या या सन्मानामुळे जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.



