
अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शहापूर गावात काल रात्रीच्या सुमारास पशुधन चोरीची मोठी घटना उघडकीस आली असून, तब्बल दहा जनावरांची चोरी झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरीकडे चोरीच्या घटना यामुळे शेतकरी दोन आगीत सापडले आहेत.

ही घटना शहापूर-वासरे रस्त्यालगत घडली असून, गावाच्या बाहेर असलेल्या वेगवेगळ्या गोठ्यांमधून अज्ञात चोरट्यांनी ही जनावरे चोरून नेली आहेत. सकाळी शेतकऱ्यांना जनावरे दिसेनाशी झाल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या घटनेत खालील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे:
-
अरुण दामू पाटील यांची 1 गाय व 2 वासरे, दिनेश लोटन पाटील यांची 1 गाय व 1 वासरी, शांताराम धनराज पाटील यांची 2 गायी व 1 वासरी, अरुण प्रकाश पाटील यांचा 1 बैल व 1 गोरा, एकूण 10 जनावरे चोरीला गेल्याने या शेतकऱ्यांचे मिळून अंदाजे 5 ते 7 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये भर पडली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मारवड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस तपास सुरू असला तरी अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण आहे.
तसेच, शहापूरशिवाय ढेकू बुद्रुक गावातही अशाच स्वरूपाची चोरीची घटना घडल्याचे समोर आले आहे. प्रवीण दिलीप पाटील यांची बैलजोडी आणि अनिल प्रकाश पाटील यांची म्हैस काल रात्री 1 ते 3 च्या दरम्यान चोरीस गेली आहे. त्यामुळे हा चोरीचा सत्र एकाच टोळीने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मानसिक आणि आर्थिक नुकसान होत असून, पोलिसांनी ठोस कारवाई करून दोषींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.



