Home Cities जळगाव जळगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा; मनसेचा पाच दिवसांचा अल्टिमेटम

जळगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा; मनसेचा पाच दिवसांचा अल्टिमेटम

0
212

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेला वाळू आणि मुरुमाचा उपसा व वाहतूक तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी, २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मनसेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार शीतल राजपूत यांना निवेदन देऊन पुढील पाच दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मनसेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या जळगाव तालुक्यात गौण खनिजांचा आणि विशेषतः वाळूचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या वाळूची सर्रासपणे विक्री केली जात आहे. धानोरा, म्हसावद, आव्हाणे, खेडी यांसारख्या गावांमध्ये गिरणा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात आहे. यामुळे नदीपात्रांची खोली वाढत आहे, जे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.
निवेदनानुसार, सध्या नदीपात्रात पाणी असल्यामुळे वाळू माफिया आता नवीन तंत्रज्ञान वापरत आहेत. रात्रीच्या वेळी इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. त्यानंतर ती वाळू मोठ्या डंपरने रातोरात शहरात आणून विकली जाते. या बेकायदेशीर व्यवसायाला काही संबंधित विभागातील अधिकारी, तलाठी, मंडळाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी हे अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याचा आरोपही मनसेने केला आहे. या सर्व बेकायदेशीर वाळू व्यावसायिकांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे.  जर प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

Protected Content

Play sound