जळगाव प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीपूर्वी शेवटच्या महत्वाच्या जिल्हा नियोजनाच्या सभेत ठोस निर्णयाची उदासीनताच दिसली. पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
जिल्हा ग्रंथालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी, घरकुल बांधण्यासाठी मिळणारी वाळू, पोलीसांच्या निवारा इमारत, वैदयकिय महाविद्यालय, आसोदा जलशुध्दीकरण, खिरोदा येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न, अमळनेर तालुक्यातील गावातील पाण्याचा प्रश्न, बोदवड तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी आणलेली पाईपलाईनसाठी येणाऱ्या अडचणी, आयटीआय विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी आलेला निधी अशा अनेक योजनांसाठी आलेला निधी हा नियोजनाअभावी समर्पित अर्थात शासन जमा झाल्याने नियोजन समिती सदस्य आणि अधिकाऱ्यांमध्ये केवळ चर्चा करण्यात आली. ठोस असा कोणताही आदेश किंवा निर्णय देण्यात आलेला नाही.
जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, अमळनेर, बोदवड या तालुक्यांमध्ये आजही सद्यस्थितीत टँकरने काही गावांमध्ये पाणीपुरवठा होत आहे. भडगाव आणि पाचोरा या तालुक्यातील एकुण 60 गावांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यासाठी गिरणेचे शेवटचे पाचवे आवर्तन जर आज सोडले तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी केली. तर चहार्डी गटातील कोल्हापुरी पॅटर्न पाझर तलावाचे काम आज अपुर्णावस्थेत आहे. जिल्हा परीषदेकडे या कामांसाठी वेळोवेळी मागणी करूनही कोणत्याच प्रकारची दखल घेतली जात नाही. किंवा मंजूर केलेला निधी लवकर मिळत नाही. असा आरोप चहार्डी गटाचे सदस्य यांनी केला.
जुन्या प्रकल्पांवर निधीची सदस्यांची मागणी
नवीन प्रकल्पांऐवजी जुन्या प्रकल्पांसाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी यावेळी नियोजन समितीच्या सदस्यांनी केला. पाण्याचा जलसाठा वाढविण्यासाठी नवीन प्रकल्पांना मंजूरी देण्याऐवजी जिल्ह्यात आजही अनेक जुने प्रकल्प आहेत की, त्यांची दुरूस्ती करून त्याद्वारे अनेक कामे मार्गी लागणार आहे. जुन्या प्रकल्पांना निधी मिळण्यासाठी सर्वांनी सहमती दाखविली.
जलयुक्तची कामे अजून अपुर्णच- आ. सावकारे
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. जलयुक्तचा हा चौथा टप्पा आहे. या चौथ्या टप्प्यात सुमारे 101 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. डिसेंबर 2019 पर्यंत चौथ्या टप्प्याचे कामे पुर्ण होण्याची मुदत आहे. मात्र गेल्या तिन टप्प्यात जिल्ह्यात कोणत्याही भागात जलयुक्त शिवारचे ठोस कामे झालेले नाही, अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी केला.
बहिणाबाई विद्यापीठ परीसरात विद्यूत वाहनांची मागणी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ हे निसर्गरम्य आहे. या भागात बाहेरील विद्यार्थी किंवा बाहेर गावातील, राज्यातील पाहुणे येतात. यासाठी प्रदुषणविरहित इलेक्ट्रॉनीक वाहनांची व्यवस्था करण्यासाठी 50 लाख रूपयांची मागणी विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांनी केली.