
रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी फैजपूर उपविभागीय पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई हाती घेतली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या दुर्गा उत्सवात शांतता आणि भक्तिभावाचे वातावरण अबाधित राहावे, यासाठी उपविभागातील चार पोलिस स्टेशन हद्दीतील एकूण १९० उपद्रवींवर हद्दपार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांनी दिली आहे.

ही कारवाई रावेर, फैजपूर, निंभोरा आणि यावल या पोलिस स्टेशन हद्दीतील उपद्रवींवर करण्यात आली असून, त्यामुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही वर्षांपासून सण-उत्सवाच्या काळात काही ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाल्याचे पोलिसांच्या नजरेत आले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांनी सुरक्षिततेच्या भावनेतून सण साजरा करावा, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी बडगुजर यांनी सांगितले की, दुर्गा उत्सव हा भक्ती, उत्साह आणि एकात्मतेचा सण आहे. मात्र, या काळात उपद्रवी घटक कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण करतात. त्यामुळे अशा व्यक्तींना हद्दपारीची कारवाई करून सण शांततेत पार पाडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
दरम्यान, हद्दपारीच्या या कारवाईमुळे उपद्रव करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करत, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांना पाठिंबा दर्शवला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे उत्सव अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी धार्मिक श्रद्धा, शांतता आणि उत्साह यांच्या वातावरणात दुर्गा उत्सव साजरा करावा, तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी बडगुजर यांनी केले आहे



