Home राजकीय मोदींचं आज देशाला महत्त्वाचं संबोधन; टॅरिफ आणि H-1B व्हिसा निर्णयावर जगाचं लक्ष

मोदींचं आज देशाला महत्त्वाचं संबोधन; टॅरिफ आणि H-1B व्हिसा निर्णयावर जगाचं लक्ष

0
148

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। अमेरिकेने अलीकडे घेतलेल्या टॅरिफ आणि H-1B व्हिसासंदर्भातील धक्कादायक निर्णयामुळे संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. जागतिक पातळीवर व्यापार आणि रोजगार यावर मोठा परिणाम करणाऱ्या या निर्णयांवर मोदी काय भूमिका घेतात, याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं आहे.

अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांनुसार, H-1B व्हिसासाठी तब्बल 88 लाख रुपये इतकं प्रचंड शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या व्हिसाचा सर्वाधिक लाभ भारतीय नागरिक घेत असल्याने याचा थेट परिणाम भारतातील लाखो आयटी प्रोफेशनल्सवर होणार आहे. अनेक भारतीय नागरिकांनी यामुळे अमेरिकेतील नोकरीचे स्वप्न गमावण्याची भीती व्यक्त केली असून, काहींनी तातडीने अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतल्याचंही समोर आलं आहे.

याचबरोबर अमेरिकेने भारतावर आधीच 50 टक्के टॅरिफ लादले आहेत. यामुळे अमेरिकेतून भारतात येणाऱ्या काही महत्त्वाच्या वस्तूंच्या व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. ट्रम्प प्रशासनाकडून भारतावर सातत्याने आर्थिक दबाव आणण्याचे संकेत मिळत असून, रशियाकडून भारताने तेल खरेदी थांबवावी यासाठीही अमेरिकेचा दबाव वाढत चालला आहे. मात्र, भारताने अद्याप अमेरिकेच्या अटी स्वीकारलेल्या नाहीत.

याआधीही पंतप्रधान मोदींनी टॅरिफच्या मुद्द्यावर भाष्य करत भारतीय नागरिकांना स्वदेशी वस्तू वापरण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे आता ते अमेरिकेच्या H-1B व्हिसा धोरणावर काय भाष्य करतात, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. ट्रम्प यांनी जरी भारतावर आर्थिक निर्बंध लादले असले, तरी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना ‘माझा जवळचा मित्र’ असे संबोधून शुभेच्छा दिल्याची पोस्ट अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामुळे राजकीय पातळीवर संबंध टिकून असले तरी आर्थिक संबंध तणावपूर्ण होत असल्याचे स्पष्ट दिसते.

मोदी आजच्या संबोधनात अमेरिकेच्या या नव्या धोरणांचा भारतावर होणाऱ्या परिणामांचा उल्लेख करतील, अशी शक्यता आहे. त्याचबरोबर भारतीय नागरिकांना दिलासा देणारे काही महत्त्वाचे निर्णयही ते जाहीर करू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.


Protected Content

Play sound