Home Cities जळगाव जळगावमध्ये ‘खाऊ गल्ली’चे उद्घाटन : महिलांच्या स्वावलंबनाचा प्रभावी मंच

जळगावमध्ये ‘खाऊ गल्ली’चे उद्घाटन : महिलांच्या स्वावलंबनाचा प्रभावी मंच

0
366


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावकर खवय्यांसाठी एक नवीन पर्व सुरू झाले आहे. महिला बचत गटांच्या कलेला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आणि पारंपरिक चवांचा आस्वाद घेण्यासाठी बांधण्यात आलेल्या ‘खाऊ गल्ली’चे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 20 सप्टेंबर) उत्साहात पार पडले. ही खाऊ गल्ली फक्त खाण्यासाठीचे ठिकाण नसून, ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाचा प्रभावी मंच ठरणार आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले की, “ही खाऊ गल्ली ग्रामीण महिलांसाठी बारमाही उत्पन्नाचा स्रोत ठरेल. पारंपरिक, स्वादिष्ट पदार्थांच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. हे केवळ खाद्यपदार्थांचे केंद्र नसून, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचे प्रतीक ठरेल.”

ही संकल्पना २२ जुलै रोजी बहिणाबाई मार्टच्या उद्घाटनावेळी मांडण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी पुढाकार घेत अवघ्या दोन महिन्यांत या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले. खाऊ गल्लीचे स्थानही अतिशय मध्यवर्ती ठिकाणी, राजकमल टॉकीजजवळील जिल्हा परिषद बचत भवन येथे निश्चित करण्यात आले आहे, जेणेकरून अधिकाधिक नागरिक याचा लाभ घेऊ शकतील.

प्रत्येक महिला बचत गटाला येथे स्वतंत्र स्टॉल देण्यात आले असून, नाममात्र भाड्यात या स्टॉल्समधून पारंपरिक चवांचे पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहेत. यामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य लाभेल आणि शहरवासीयांना स्थानिक व पारंपरिक चवांचा मनमुराद अनुभव घेता येणार आहे.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार राजू मामा भोळे, सीईओ मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, महिला पदाधिकारी, शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष सरिता माळी, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह महिला बचत गटांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी यावेळी सांगितले की, “खाऊ गल्ली खवय्यांसाठी नंदनवन ठरेल. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे आणि महिलांना स्वयंपूर्ण बनविणे हेच यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जळगाव शहरात खवय्यांना चविष्ट अनुभव मिळेलच, पण त्या पलीकडेही एक सामाजिक परिवर्तन घडेल.”

या खाऊ गल्लीतून केवळ खाद्यपदार्थांची देवाण-घेवाण होणार नसून, महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा उत्कृष्ट संगम जळगावकरांना अनुभवता येणार आहे.


Protected Content

Play sound