
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अडावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय आरोग्य शिबिरांचा भव्य शुभारंभ आमदार प्रा. चंद्रकांत (आण्णासाहेब) सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमात महिलांसाठी विविध मोफत आरोग्य तपासण्या, पोषण आहारविषयक मार्गदर्शन आणि आरोग्य जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.

दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या उद्घाटन समारंभात आमदार प्रा. सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित माता-भगिनींना या शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहन करत महिलांचे आरोग्य हे सशक्त कुटुंबासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमास तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर यांची देखील उपस्थिती लाभली.
या अभियानांतर्गत तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि बालकल्याण विभाग यांच्या समन्वयातून महिलांसाठी रक्तदाब, रक्ततपासणी, हिमोग्लोबिन, मधुमेह, क्षयरोग, कर्करोग, मोतीबिंदू तसेच ईसीजी तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून महिलांना पोषण आहाराचे महत्त्व पटवून देणारे मार्गदर्शन देखील करण्यात येत आहे.
शुभारंभ प्रसंगी सरपंच बाबनखा तडवी, ग्रामपंचायत सदस्या भारतीताई सचिन महाजन, विजिताताई हरिश पाटील, माजी सरपंच भावनाताई माळी, नामदेव पाटील, लोकेश काबरा, प्रकाश महाजन, रियाजअली सैय्यद तसेच आरोग्य विभागाचे डॉ. पवन सुशीर, डॉ. अर्चना पाटील, पर्यवेक्षिका पुनम ठाकरे, जयमाला ठाकरे यांच्यासह शेकडो महिला ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिरात सहभागी महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होणार असून, आरोग्याबाबत जनजागृती घडवून आणण्याचा हेतू यामागे असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.



