पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मुंदाणे प्र.ऊ. येथे ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत ग्रामस्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमुळे ग्रामविकास, नागरिकांची जबाबदारी आणि पंचायतीच्या कार्यपद्धतीबाबत जागरूकता निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील अशोक पाटील, सरपंच सुलाबाई पाटील, उपसरपंच राजकुमार पाटील, तसेच आनंदा पाटील, आबाजी पाटील, सुनील पाटील, दिलीप सोनार, नाना पाटील, रोहिदास पाटील, चंद्रकांत पाटील, सूर्यभान पाटील, भरत पाटील, अशोक पाटील यांसारखे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यशाळेत किरण पाटील यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे विविध घटक, कालावधी, उद्दिष्टे आणि त्या अंतर्गत दिले जाणारे पुरस्कार यांची सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिली. नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य समजावून सांगताना त्यांनी लोकसहभागाची गरज अधोरेखित केली. गावच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक सहभाग आणि जबाबदारीचे महत्त्व त्यांनी विशद केले.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर ग्रामशाळेच्या आवारात तसेच स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडलेल्या वृक्षारोपण उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले.
या कार्यशाळेने ग्रामस्थांमध्ये जागरूकता वाढवली असून आगामी काळात गावच्या विकासासाठी अधिक सक्षम निर्णय प्रक्रिया घडेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



